महाराष्ट्रात 18 जणांना निवडणूक लढण्यास बंदी; आयोगाकडून अपात्र उमेदवारांची यादी जाहीर
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोग आज (16 मार्च) आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा करणार आहे. मात्र त्यापूर्वीच आयोगाने देशभरातील विविध राज्यांमधील सुमारे 1070 अपात्र उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील एकूण 18 उमेदवारांचा समावेश आहे. गत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकातील खर्चाचे तपशील सादर न केल्यामुळे आयोगाने या उमेदवारांना अपात्र ठरविले आहे. त्यामुळे आता या 18 व्यक्तींना ही लोकसभा आणि आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढविण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
कोणाकोणाचा यादीत समावेश?
मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविणारे मोहम्मद मेहमूद सय्यद शहा या उमेदवाराने गत निवडणुकीचा खर्च सादर न केल्याने त्यांच्यावर ही कारवाई झाली आहे. तर जिंतूर विधानसभा मतदारसंघातील दिनकर गायकवाड, आमगाव मतदारसंघातील अमर पांढरे, उमेशकुमार सरोटे, अंबरनाथ मतदारसंघातील दीपक गाडे, सिंदखेडा मतदारसंघातील नरेंद्र पाटील, नांदेड दक्षिण मतदारसंघातील मुदसारुद्दिन अलिमुद्दीन यांच्या नावाचा समावेश आहे.
‘भाजपला सहा हजार कोटी, मग बाकीचे 14 हजार कोटी कुठे गेले?’ इलेक्टोरल बाँडवरुन शाहांचा विरोधकांना सवाल
याशिवाय लोहा मतदारसंघातील पांडूरंग वाने, नांदगाव मतदारसंघातील गोविंद बोराळे, नाशिक पूर्व मतदारसंघातील महेश आव्हाड, भिवंडी पूर्व मतदारसंघातील हबिबुर खान, बीड मतदारसंघातील महेंद्र बोराडे, मानखूर्द-शिवाजीनगर मतदारसंघातील मोहम्मद शेख, किनवट मतदारसंघातील विशाल शिंदे, नांदेड उत्तर मतदारसंघातील इम्नान बशीर, चांदिवली मतदारसंघातील सुमीत बारसकर, मोहम्मद कुरेशी अशा 18 जणांवर निवडणूक लढण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
आज होणार निवडणुकांची घोषणा :
लोकसभा निवडणूक 2024 चे वेळापत्रक आज, शनिवारी (16 मार्च 2024) जाहीर केले जाणार असून, निवडणूक आयोग (EC) दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा करणार आहे. पत्रकार परिषदेमध्ये आयोगाकडून लोकसभा निवडणूक आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा आणि त्या किती टप्प्यात होतील हे स्पष्ट करणार आहे. निवडणूक आयोगाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही पत्रकार परिषद थेट प्रक्षेपित केली जाणार असून, लोकसभेच्या निवडणुका एप्रिल-मे 2024 दरम्यान आठ टप्प्यांत घेतल्या जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
‘लोकसभेसाठी इच्छुक पण, ठाकरे गटातच राहणार’; नाराजीच्या चर्चांना दानवेंचा फुलस्टॉप!
2019 मध्ये 10 मार्च रोजी झाल्या होत्या निवडणुका जाहीर
याआधी 2019 मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा 10 मार्च 2019 रोजी जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यावेळी देशात सात टप्प्यात मतदान झाले होते. पहिल्या फेरीचे मतदान 11 एप्रिल रोजी झाले, तर सातव्या आणि शेवटच्या फेरीचे मतदान 19 मे रोजी झाले. 23 मे रोजी मतमोजणी झाली होती.