मुख्यमंत्रिपदाचे चेहरेच पडले, राज्यात कुठे कुठे धक्कादायक निकाल?
Maharashtra Election Result 2024 : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत महायुतीने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत प्रचंड विजय मिळवला. बहुमतापेक्षाही जास्त जागा जिंकत पुन्हा सत्तेत वापसी केली. मराठवाडा, विदर्भ, कोकण, उत्तर महाराष्ट्र अशा सर्वच ठिकाणी महायुतीने मोठा विजय मिळवला. महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. महायुतीत एकट्या भाजपने तब्बल 137 जागांवर आघाडी घेतली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 58 तर अजित पवार गटाने 41 जागा जिंकल्या. याउलट महाविकास आघाडीतील काँग्रेसला फक्त 20 जागा मिळाल्या. तर शरद पवार गटाला 14 तर ठाकरे गटाला 15 जागा मिळाल्या आहेत.
महाविकास आघाडीत अनेक नेते मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून गणले जात होते. मात्र या दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का बसला. अटीतटीच्या लढतीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मात्र विजयी झाले आहेत. संगमनेर मतदारसंघात काँग्रेस नेते माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा अमोल खताळ या नवख्या उमेदवाराने पराभव केला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही पराभवाचा धक्का बसला.
उत्तर महाराष्ट्रात एकहाती ‘सत्ता’…
जामनेर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गिरीष महाजन यांना 1 लाख 28 हजार 667 तर महाविकास आघाडीचे खोपडे दिलीप यांना 1 लाख 1 हजार 782 मते मिळाली आहेत. या लढतीत महाजनांनी खोपडेंचा 26 हजार मतांनी पराभव केला आहे. छगन भुजबळ यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदे यांचा मोठ्या मताधिक्क्याने पराभव करीत मनोज जरांगे फॅक्टरवर मात केल्याचं स्पष्ट दिसून आलंय. देवळाली मतदारसंघातून महायुतीच्या सरोज आहिरे यांनी मविआचे योगेश घोलपांचा पराभव करत पुन्हा एकदा विधानसभेवर गेल्या आहेत. तसेच नांदगावमध्ये मविआचे गणेश धात्रक यांचा पराभव करत महायुतीचे सुहास कांदे विजयी झाले आहेत.
खासदार निलेश लंकेंना धक्का, पत्नीचा पराभव…
पारनेर विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून काशिनाथ दाते तर महाविकास आघाडीकडून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके मैदानात होत्या. राणी लंके यांना 1 लाख 359 मते मिळाली असून दाते यांना 1 लाख 2896 मते मिळाली आहेत. या अतितटीच्या लढतीत दाते यांनी लंकेंचा 2 हजार 500 मतांनी पराभव केला.
काँग्रेसचे दिग्गज बाळासाहेब थोरातांचा पराभव
संगमनेर मतदारसंघातून यंदाच्या निवडणुकीत सुजय विखे यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, भाजपकडून अमोल खताळ यांना उमेदवार देण्यात आली. तर महाविकास आघाडीकडून बाळासाहेब थोरात रिंगणात होते. या निवडणुकीत खताळ यांना 1 लाख 12 हजार 386 मते तर बाळासाहेब थोरात यांना 1 लाख 1 हजार 826 मते मिळाली आहेत. खताळ यांनी थोरात यांचा 10 हजार मतांनी पराभव केला.
शेवगाव -पाथर्डी मतदारसंघातून महायुतीच्या मोनिका राजळे यांनीच पुन्हा एकदा बाजी मारली असून राजळे यांना 82 हजार 207 मते मिळाली असून महाविकास आघाडीचे प्रताप ढाकणे यांना 57 हजार 344 मते मिळाली आहेत.
अहिल्यानगर शहर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांचा जवळपास 39 हजार मतांनी पराभव करुन दणदणीत विजय मिळवलायं. तर राहुरी मतदारसंघातून महायुतीचे शिवाजीराव कर्डिले यांनी विद्यमान असलेले प्राजक्त तनपुरे यांचा 18 हजार मतांनी पराभव केलायं. तर कोपरगाव मतदारसंघातून महायुतीचे आशुतोष काळे यांनी मोठं मताधिक्य घेत विजय मिळवलायं. तर अकोल्यात अजित पवार गटाचे किरण लहामटे यांनी महाविकास आघाडीच्या अमित भांगरेचा पराभव करत पुन्हा एकदा विजय मिळवलायं.
काँग्रेसने विदर्भ गमावला!
विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजप-महायुतीने मोठी आघाडी घेतली आहे. तब्बल 200 हून अधिक जागांवर महायुतीला आघाडी मिळाली. एकट्या विदर्भात महायुतीला 50 जागा मिळाल्या आहेत. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला विदर्भात 10 पैकी 2 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीने 7 जागा जिंकल्या होत्या. मात्र, विधानसभेला विदर्भात महायुतीने मुसंडी मारली आहे. विदर्भातील एकूण 62 विधानसभा मतदारसंघापैकी महायुतीला 50 जागा मिळाल्या आहेत. एकट्या भाजपला 39, शिवसेना शिंदे गटाला 4 तर अजित पवार गटाला 6 जागा मिळाल्या आहेत. युवा स्वाभिमान पक्षाला एक जागा मिळाली.
Assembly Election Result : लाडक्या बहिणींची कमालच! उत्तर महाराष्ट्रात दिली एकहाती ‘सत्ता’…
विदर्भात कोणाचा पराभव?
यशोमती ठाकूर, अनुजा केदार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, डॉ. सुनील देशमुख, बच्चू कडू, सलील देशमुख यांनाही पराभवाचा हादरा बसला आहे.
मराठवाड्यात महाविकास आघाडीचं पानिपत
लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीला मनोज जरांगे फॅक्टरचा चांगलाच दणका बसला होता. मराठवाड्यात महायुतीचा सुपडा साफ झाला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे फॅक्टर चालला की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
बीड जिल्ह्यातील आष्टी पाटोदा मतदारसंघात भाजप उमेदवार सुरेश धस विजयी झाले. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मोठा मुलगा धीरज देशमुख यांचा पराभव झाला आहे. औरंगाबाद पू्र्व मतदारसंघात भाजपाच्या अतुल सावे यांनी हॅटट्रीक केली. सावेंनी एमआयएमचे इम्तियाज जलील यांचा पराभव केला.
शरद पवार यांचे अतिशय विश्वासू माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदारसंघात पराभव झाला आहे. परळी मतदारसंघात अजित पवार गटाचे धनंजय मुंडे यांचा मोठा मताधिक्याने विजय झाला. माजलगाव मतदारसंघात महायुतीचे प्रकाश सोळंके विजयी झाले आहेत.
नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार श्रीजया चव्हाण या विजयी झाल्या आहेत.
मुंबईसह ठाणे कोकणातही महायुतीचा झेंडा
मुंबई, ठाणे आणि कोकणातही महायुतीचा जलवा दिसला. या ठिकाणी महायुतीला 35 तर महाविकास आघाडीला फक्त 15 जागा मिळाल्या. मुंबईत प्रकाश सु्र्वे (मागाठाणे), मनीषा चौधरी (दहिसर), संजय उपाध्याय (बोरिवली), अतुल भातखळकर (कांदिवली), योगेश सागर (चारकोप) या महायुतीच्या उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला.
डोंबिवलीत गड कायम राखला असून चव्हाण यांनी चौथ्यांदा 76 हजार 896 मताधिक्य मिळवून विजय मिळवला. मुंबईत महायुतीला एकूण 23 मविआला 12 आणि अन्य पक्षांना एक जागा मिळाला. ठाणे कोकणात महायुतीला 32 तर महाविकास आघाडीला फक्त 4 जागा मिळाल्या.
महायुती-मविआचं रिपोर्ट कार्ड
ठाणे कोकण
महायुती 32
मविआ 4
इतर 3
मराठवाडा
महायुती 40
मविआ 6
विदर्भ
महायुती 48
मविआ 13
इतर 1
मुंबई
महायुती 23
मविआ 12
इतर 1
पश्चिम महाराष्ट्र
महायुती 44
मविआ 10
इतर 4
उत्तर महाराष्ट्र
महायुती 41
मविआ 3
इतर 3