तावडेंच्या योजनेला फडणवीसांचा सुरुंग : निवृत्त अधिकाऱ्यांसाठी ‘खासदारकी’ स्वप्नच राहिली!
मुंबई : प्रशासन गाजवल्यानंतर राजकीय क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी उत्सुक असलेल्या माजी सनदी अधिकाऱ्यांना पहिल्याच टप्प्यात अपयश आले आहे. राजकीय पक्षांकडून विशेषतः भाजपकडून (BJP) या नव्या नेत्यांना उमेदवारीच मिळविता आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या पदरी निराशा आली. यात माजी आयएएस अधिकारी प्रवीणसिंह परदेशी (Praveen Singh Pardeshi), राधेश्याम मोपलवार (Radheshyam Mopalwar), माजी आयपीएस अधिकारी प्रताप दिघावकर (Pratap Dighavkar) यांचा समावेश आहे. (Ex-IAS officer Praveen Singh Pardeshi, Radheshyam Mopalwar, Ex-IPS officer Pratap Dighavkar failed to get candidature.)
मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांचे सचिव म्हणून काम केलेल्या प्रवीणसिंह परदेशी यांना भाजपकडून उस्मानाबादमध्ये उमेदवारी दिली जाणार, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, आता तेथे अजित पवार गटाकडून भाजपचे आमदार राणा जगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांची यांना उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. समृद्धी महामार्गाच्या उभारणीत मोलाची भूमिका बजावणारे माजी आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना महायुतीतर्फे हिंगोलीमधून लढविले जाईल, अशी जोरदार चर्चा होती. पण शिवसेनेने तिथे हेमंत पाटील यांना उमेदवारी दिली आहे.
Loksabha Election 2024 : हातकणंगलेचा उमेदवार बदलणार? धैर्यशील मानेंनी सांगितली रिअल स्टोरी
माजी आयपीएस अधिकारी प्रताप दिघावकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ते धुळे मतदारसंघात लढण्यास इच्छुक होते आणि तशी मागणीही त्यांनी पक्षाकडे केली होती. मात्र, तेथे विद्यमान खासदार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनाच पक्षाने पुन्हा संधी दिल्याने दिघावकर यांचे स्वप्न भंगले. या सगळ्यांनीच काही दिवसांपूर्वी सरकारी सेवेतून बाजूला होत राजकीय क्षेत्रात नशीब आजमावण्याची तयारी केली होती. पण उमेदवारी मिळविण्याच्या पहिल्याच टप्प्यात त्यांना अपयश आले आहे.
तावडेंच्या योजनेला फडणवीसांचा सुरुंग :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्ताकाळात भाजपने अनेक सनदी, पोलीस अधिकाऱ्यांना राजकारणात आणले आणि मंत्रीपदे बहाल केली. यात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह, जनरल व्ही. के. सिंह यांची नावे प्रमुख्याने घेता येतील. महाराष्ट्रात यापूर्वी आयएएस म्हणून काम केलेले श्रीनिवास पाटील, प्रभाकर देशमुख, रायभान जाधव यांनी प्रशासकीय नोकरीतून राजकारणात प्रवेश केला होता. यात श्रीनिवास पाटील हे खासदार, राज्यपाल आणि पुन्हा खासदार झाले. तर रायभान जाधव हेही दोनवेळा विधानसभेवर निवडून गेले. प्रभाकर देशमुख सध्या शरद पवार यांच्या पक्षात आहेत.
विखेंच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी मैदानात…मंत्री मुश्रीफांच्या उपस्थितीत गुरुवारी मेळावा
याच धर्तीवर भाजपने देशभरातील 50 माजी IAS आणि IPS अधिकाऱ्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याची तयारी केली होती. यात महाराष्ट्र केडरचे माजी आयपीएस अधिकारी परमबीर सिंग, प्रवीणसिंह परदेशी आणि राधेश्याम मोपलवार यांच्या नावाची चर्चा होती. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि बीएल संतोष यांनी गतवर्षी जून महिन्यात देशव्यापी दौरा करुन कोण अधिकारी भाजपच्या साच्यात बसू शकतात आणि निवडून येऊ शकतात याचा आढावा घेतला होता. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांना उमेदवारी देण्यात फारसा रस दाखवलेला नाही.