स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण अन् तीन नावीन्यपूर्ण डिजिटल उपक्रमांचा शुभारंभ

Radhakrishna Vikhe Patil : भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस मुख्यालय कवायत मैदानावर जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. त्यांनी जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, महानगरपालिका आयुक्त डॉ. यशवंत डांगे, उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल आदी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार व धनादेश वितरण तसेच उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सेना दलात कार्यरत असताना वीरमरण आलेले शहीद जवान रामचंद्र लहू साठे (लोणी हवेली, ता. पारनेर), रामदास साहेबराव बढे (मेंढवण, ता. संगमनेर) व संदीप पांडुरंग गायकर (मु. पो. ब्राम्हणवाडा, ता. अकोले) यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचा मदतीचा धनादेश देण्यात आला.
जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत जीवाची पर्वा न करता दोन महिलांना व इतर नागरिकांना जीवनदान देणारे सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, पोलीस कॉन्स्टेबल नितीन गांगुर्डे व अन्सार शेख यांचा विशेष सन्मान झाला. शंभर दिवसांच्या विशेष कार्यालयीन सुधारणा मोहिमेअंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 23 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 49 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान झाला. जिल्हा शासकीय रुग्णालयातील 19 जिवंत अवयवदात्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शिष्यवृत्ती परीक्षा 2025 मध्ये राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्या जिल्ह्यातील 18 विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. जिल्हा परिषद आरोग्य विभागास शासनाकडून प्राप्त पाच शववाहिकांचे लोकार्पणही करण्यात आले. या प्रसंगी पालकमंत्री विखे पाटील यांनी स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, नागरिक तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तीन नाविन्यपूर्ण उपक्रमांचा शुभारंभ
कार्यक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तीन डिजिटल उपक्रमांचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला. या उपक्रमांचा उद्देश नागरिकांशी थेट व तातडीचा संवाद अधिक मजबूत करणे आणि योजना अंमलबजावणीत पारदर्शकता वाढवणे हा आहे. ‘जिल्हाधिकारी कार्यालय – संवाद सेतू’ या सेवेमार्फत विविध विभागांच्या सेवा, आवश्यक कागदपत्रांची यादी व नजीकच्या सेतू केंद्रांची माहिती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने व्हॉट्सॲपवर मिळणार आहे.
Asia Cup साठी 19 ऑगस्टला भारतीय संघाची घोषणा पण ‘या’ 3 खेळाडूंना मिळणार नाही संधी
‘जिल्हाधिकारी कार्यालय व्हॉट्सॲप चॅनेल – आपलं शिवार’ या अधिकृत चॅनेलद्वारे प्रशासनाची अद्ययावत माहिती, आपत्तीविषयक सूचना तसेच राज्य शासनाच्या उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत थेट पोहोचवली जाईल. याशिवाय, विशेष न्याय विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या अनुदानांच्या प्रगतीस्थितीची माहिती लाभार्थ्यांना मोबाईलवर पाहण्याची सुविधा उपलब्ध होईल, ज्यामुळे वेळ व खर्च वाचेल तसेच पारदर्शकता वाढेल. या उपक्रमांमुळे प्रशासन-नागरिक संवाद अधिक सुलभ व परिणामकारक होण्यास मदत होईल.