शिरवळमध्ये भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
टाटा नेक्सॉन कार डिव्हायडरला धडकून पलटी झाली. त्यानंतर कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकवर आदळली.
सातारा-पुणे महामार्गावर शिरवळजवळ (Accident) मध्यरात्री भीषण अपघात झाला. भरधाव टाटा नेक्सॉन कार डिव्हायडरला धडकून पलटी झाली. त्यानंतर कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकवर आदळली. या भीषण अपघातात कारमधील चौघांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हा अपघात रात्री सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास शिरवळ येथील हॉटेल शिवालयसमोर घडला. प्राथमिक माहितीनुसार, कार चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरला धडकली. त्यानंतर कार पलटी होऊन समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, कारचा मोठ्या प्रमाणात चक्काचूर झाला.
कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा भीषण भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती जमीनदोस्त
या अपघातात वेदांत वारिंगे, सोनलिंग ठाकूर, आदित्य गरुड आणि निखिल राऊत या चार तरुणांचा मृत्यू झाला. हे सर्वजण मावळ-तळेगाव परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. अपघातातील दोघा जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच सारोळा महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून हटवण्यात आली आणि त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. या प्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, पुणे आणि मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गांवरील अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबई-बंगळुरू महामार्ग, जुना पुणे-मुंबई महामार्ग, पुणे-नाशिक महामार्ग तसेच तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्ग हे अपघातांचे हॉटस्पॉट ठरत असल्याचे चित्र आहे. एका खासगी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, मागील अडीच वर्षांच्या कालावधीत या चार प्रमुख मार्गांवरील विविध अपघातांमध्ये सुमारे **355 जणांचा मृत्यू, तर 492 जण गंभीर जखमी झाले आहेत. शिरवळमधील या अपघातामुळे पुन्हा एकदा महामार्गावरील वेग, वाहनांवरील नियंत्रण आणि सुरक्षिततेचा प्रश्न गंभीरपणे समोर आला आहे.