गणेश नाईकांचा उपमुख्यमंत्री शिंदेंवर थेट हल्ला; जेलमध्ये जावं लागेल, विधानाने खळबळ
एका मुलाखतीत नाईकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत “त्यांना जेलमध्ये जावं लागेल” असा खळबळजनक दावा केला.
Ganesh Naik’s direct attack on Deputy Chief Minister Shinde : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांचं धडक विधान? महापालिका निवडणुकीपासून पेटलेला नाईक-शिंदे संघर्ष आता उघडपणे समोर येऊ लागलाय. एका विशेष मुलाखतीत नाईकांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत “त्यांना जेलमध्ये जावं लागेल” असा खळबळजनक दावा केला. इतकंच नाही, तर खासदार श्रीकांत शिंदे यांचं राजकीय अस्तित्व संपवण्याचाही इशारा त्यांनी दिला.
या वक्तव्यावर श्रीकांत शिंदे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं. “ज्यांच्या घरात तीन ‘माजी’ आहेत, त्यांनी आम्हाला माजी करण्याची भाषा करू नये,” असा टोला लगावत त्यांनी नाईकांवर पलटवार केला. महायुती सत्तेत आल्यानंतरच नाईकांना भाजपकडून शिंदेंविरोधात बळ मिळत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. ठाण्यात घेतलेल्या जनता दरबारातून नाईकांनी शिंदेंना थेट शह दिला होता.
त्यानंतर महापालिका निवडणुकीत हा संघर्ष अधिकच तीव्र झाला. नवी मुंबई महापालिकेत भाजपचे तब्बल 65 नगरसेवक निवडून आणत नाईकांनी आपली ताकद दाखवून दिली. मात्र ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत भाजपला दूर ठेवत शिंदेंनी सत्तेचं गणित जुळवलं. हा संघर्ष काही नवा नाही. ठाण्यातील दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या काळापासूनच नाईक आणि शिवसेनेतील मतभेद उफाळत आले.
मोठी बातमी : अहिल्यानगरमधील तरुण दहशतवादी संघटनांच्या संपर्कात? एटीएसची छापेमारी, अनेकांकडे चौकशी
1995 मध्ये ठाण्याच्या पालकमंत्रिपदावरून आनंद दिघे आणि नाईक यांच्यात ठिणगी पडली.
1999 मध्ये नाईकांनी शिवसेना सोडल्यानंतर भोईरांना बळ देत दिघेंकडून नाईकांचा पराभव घडवला गेला.
2004 मध्ये पालकमंत्री असताना नाईकांनी एकनाथ शिंदेंना शह देण्याचा प्रयत्न केला.
2009 मध्ये पुत्र संजीव नाईकांना खासदार बनवत नाईकांनी शिंदेंना राजकीय धक्का दिला.
2014 मध्ये शिंदेंनी भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांना बळ देत नाईकांना पराभूत केलं.
2019 मध्ये पालकमंत्री असताना शिंदेंनी नाईकांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला.
आता ठाणे जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात आणण्याचा निर्धार गणेश नाईकांनी जाहीर केलाय. ठाणे आणि नवी मुंबईतील वर्चस्वासाठी नाईक-शिंदेंमधील संघर्ष चिघळत चाललाय. दोन्ही बाजूंनी एकमेकांचं नामोनिशाण मिटवण्याची भाषा होत असल्याने महायुतीत अंतर्गत वादाची ठिणगी पडली आहे. या वर्चस्वाच्या लढाईत अखेर कोण बाजी मारणार? महायुतीतील हा संघर्ष आणखी किती पेटणार? ठाणे-नवी मुंबईच्या राजकारणात पुढचा डाव कोणाचा भारी ठरणार? याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
