Gopichand Padalkar : नेहरुंचा भारत म्हणजे रायसीना हिल्स, तर मोदींनी विकास घरोघरी पोहोचवला
पुणे : भारतामध्ये पंडित नेहरू आणि नरेंद्र मोदी या पंतप्रधानांच्या कारकिर्दीचे दोन भाग करता येतील. नरेंद्र मोदी यांनी भारताच्या कानाकोपऱ्यात विकासाची पाळेमुळे नेऊन पोहचवली. त्यामुळे खऱ्या अर्थाने आज भारताचा सर्वांगीण विकास होताना आपल्याला दिसत आहे. तर पंडित नेहरू यांना दिल्लीतील रायसीना हिल्स हाच भाग भारत वाटत होता, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटच्या वतीने आयोजित ६ व्या युवा संसद सभेमध्ये ‘आयडिया ऑफ इंडिया’ या सत्रामध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर बोलत होते.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, बदलत्या भारताचे स्वरूप मानणारा मी कार्यकर्ता आहे. माझं गाव तर फक्त शंभर घराचं गाव आहे. मी आणि सदाभाऊ खोत असे दोघे राजकारणात प्रस्थापितांच्या विरोधात मोठ्या हिमतीने लढत आहे. तुम्हां सगळ्यांना या विषयाची जाणीव असायला पाहिजे. म्हणून मी देशाच्या राजकारणाचे वर्गीकरण करताना दोन टप्प्यांमध्ये करतो. एक माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आणि दुसरा टप्पा आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ हा आपल्याला पाहावा लागेल.
जवाहरलाल नेहरूंवर युरोपच्या विचारांचा प्रवाह होता. त्या दृष्टिकोनातून त्यांना भारत वाटत होता. तो म्हणजे दिल्लीमधील रायसोनी हिल्स हा होता. परंतु, अखंड भारताकडे त्यांचे दुर्लक्ष केले होते. प्रामुख्याने ईशान्य भारतामध्ये तिथल्या तरुणांनी हातामध्ये शस्त्र घेतली. त्या तरुणांनी अनेक वेळा अधिकार्यांच्या हत्या केल्या. त्या लोकांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचा असताना सुद्धा त्या काळामध्ये दुर्लक्ष केले. मात्र, आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांच्या हाताला काम आणि सुविधा निर्माण करण्याचे फार मोठे योगदान देत आहे. त्यामुळे तिथल्या पोरांनी हत्यार बाजूला ठेवली आणि आज भारत देशाचे नागरिक म्हणून एका चांगल्या पद्धतीने देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत, असे देखील गोपीचंद पडळकर यावेळी म्हणाले.