बीड-पुणे रेल्वे लवकरच सुरू होणार; पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची मोठी घोषणा
नियोजन समितीची सभेत 2026 - 27 वर्षासाठी 623 कोटी रूपयांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली.
बीड पुणे रेल्वे गाडी सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. (Beed) याबाबतची तयारी पूर्ण झाली असल्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिलं आहे. त्यानी नुकताच बीड दौरा केला, त्यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. गेल्या वर्षी मराठवाडा मुक्ती दिनी या मार्गाची चाचणी पूर्ण झाली होती. या वर्षी याच दिवशी रेल्वे सुरू केली जाणार आहे. वेगाने विकास करण्याचे दिवंगत अजित पवार यांचे बीडबाबतचे स्वप्न आपण पूर्ण करू, असंही त्या म्हणाल्या आहेत.
नियोजन समितीची सभेत 2026 – 27 वर्षासाठी 623 कोटी रूपयांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली. यावेळी पर्यावरण व हवामान बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, खासदार बजरंग सोनवणे, आमदार विक्रम काळे, सतीश चव्हाण, प्रकाश सोळंके, धनंजय मुंडे, संदीप क्षिरसागर आदींची उपस्थिती होती. मागील मराठवाडा मुक्ती दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं. बीडहून-अहिल्यानगरपर्यंत रोज एक फेरी होते. मात्र, ही रेल्वे पुण्यापर्यंत जात नाही. हडपसरपर्यंत ही रेल्वे जावी यासाठी प्रयत्न करू, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत.
रेल्वेचा मोठा बदल! सामानासाठी आता ऑनलाइन बुकिंग; किती सामान नेता येणार?
संपूर्ण बीड जिल्ह्याची चुकीची प्रतिमा निर्माण होणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यायला हवी. हा जिल्हा कष्टकरी, प्रेमळ आणि धार्मिक परंपरा जपणाऱ्या लोकांचा तसंच महिला नेतृत्व धार्जिण जिल्हा आहे. काही घटनांमुळं संपूर्ण जिल्ह्याची बदनामी होऊ नये, यासाठी लोकप्रतिनिधींनी विशेष जबाबदारीने वागणं आवश्यक आहे अशा शब्दांत पंकजा मुंढे यांनी अनेकांचे कान टोचले आहेत. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच सर्वांचं समान ध्येय असावं. बीडची प्रतिमा जपा, विकासाला गती द्या असा सल्ला मंत्री पंकजा मुंडे यांनी दिला.
बीड जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात उसतोडणी कामगार राज्यात तसंच परराज्यात ऊस तोडणीसाठी जातात. त्यांच्यासाठी सुरू करण्यात आलेल्या उसतोडणी कामगार महामंडळाच्या कारभारावर धनंजय मुंडे व सुरेश धस यांनी प्रश्न उपस्थित केले. या महामंडळात निधीची तरतूद कमी झाली आहे. त्यामुळे नियोजन समितीतून ही रक्कम द्यावी अशी मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी या बैठकीत केली.