मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 मालवाहतूक ट्रक उलटले, दोघांचा जागीच मृत्यू

वेगात असलेल्या मालवाहतूक ट्रकचा ताबा सुटल्याने एक ट्रक दुसऱ्या ट्रकवर आदळला आणि त्यानंतर सलग तीन ट्रक उलटल्याची माहिती समोर येत आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 31 1

Horrific Accident on the Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर तीन मालवाहू ट्रक एकमेकांवर आदळून उलटल्याने हा गंभीर अपघात घडला. अपघातानंतर एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, मुंबईकडे जाणारी वाहतूक अक्षरशः ठप्प झाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक रोड संपतो त्या ठिकणी हा अपघात घडला. वेगात असलेल्या मालवाहतूक ट्रकचा ताबा सुटल्याने एक ट्रक दुसऱ्या ट्रकवर आदळला आणि त्यानंतर सलग तीन ट्रक उलटल्याची माहिती समोर येत आहे. अपघात इतका भीषण होता की ट्रकमधील मोठ्या प्रमाणावर माल, तसेच पेंटसदृश रासायनिक साहित्य रस्त्याववर विखुरले. त्यामुळे रस्ता निसरडा झाला असून वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

अपघातानंतर एक्सप्रेसवेवरील मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील केवळ एकच लेन सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, अनेक वाहनचालकांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागत आहे. विशेषतः अवजड वाहनांची संख्या जास्त असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.

तटकरे प्रदेशाध्यक्ष नाहीत, पटेल कार्याध्यक्ष नाहीत; राष्ट्रवादीत नक्की चाललय काय?

या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, काही जण जखमी झाल्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, देवदूत यंत्रणा, बचाव पथक आणि क्रेनच्या सहाय्याने मदतकार्य तातडीने सुरू करण्यात आले. उलटले ट्रक बाजूला करण्याचे आणि रस्त्यावर सांडलेले साहित्य हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

दरम्यान, अपघातामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीमुळे अनेक प्रवाशांना मोठा मनस्थाप सहन करावा लागत आहे. पोलिसांकडून वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच वाहनचालकांनी वेगमर्यादेचे पालन करून काळजीपूर्वक वाहन चालवावे, असे देखील आवाहन प्रशासनाने केले आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गेल्या काही महिन्यात अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः मिसिंग लिंक परिसरात सुरू असलेल्या कामांमुळे वाहतूक वळवली जात असल्याने वाहनचालकांना अतिरिक्त सतर्कता बाळगावी लागत आहे. आजच्या या भीषण अपघातामुळे पुन्हा एकदा एक्सप्रेसवेवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

follow us