महायुती की महाविकास आघाडी?, कोण येणार सत्तेत? ‘IANS’ च्या सर्वेक्षणाने थेट आकडेवारीच मांडली

  • Written By: Published:
महायुती की महाविकास आघाडी?, कोण येणार सत्तेत? ‘IANS’ च्या सर्वेक्षणाने थेट आकडेवारीच मांडली

IANS and Matrize Opinion Poll : विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत निकालाचा अंदाज सांगणं मोठं कठीण झालंय. कारण, पहिल्यांदाच तीन प्रमुख राजकीय पक्ष एकत्र येऊन महायुती व महाविकास आघाडी अस्तित्वात आली आहे. त्यामध्ये, दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी व मतदारही विभागले गेले आहेत. (Opinion Poll) त्यातच, लोकसभा निवडणुकांच्या निकालाचा अंदाज घेता महाविकास आघाडीचे पारडे जड दिसले. मात्र, लाडकी बहीण योजना, योजनांचा पाऊस आणि सध्याच्या संख्याबळाचा विचार केल्यास महायुतीचं पारडं जड वाटतं. त्यामुळे, या निवडणुकांचा राजकीय अंदाज येत नाही.

राज्यात 145 ते 165 जागांवर भाजप-शिवसेना

आयएनएनएस माध्यम समुहाने केलेल्या निवडणूक मतदानपूर्व सर्वेक्षणातून राज्यात कोणाचं सरकार येणार, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, महायुतीची सत्ता येणार की महाविकास आघाडीची याबाबत अंदाज व्यक्त केला आहे. त्यामध्ये, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात महायुतीला फटका बसण्याची चिन्हे दिसून येतात. आयएएनएस आणि मॅट्रीझ माध्यम समुहाच्या सर्वेक्षण अंदाजानुसार, राज्यातील 288 मतदारसंघांचा विचार केल्यास राज्यात महायुतीचं पारडं जड दिसून येत आहेत. त्यानुसार, राज्यात 145 ते 165 जागांवर भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीला विजय मिळू शकेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Maharashtra Assembly Election : भाजपचा भेदक अन् आक्रमक जाहीरनामा तयार; वाचा काय खास

यामध्ये महायुतीचं पारड जड असून महायुतीचच सरकार पुन्हा येऊ शकतं,असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. तर, काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना महाविकास आघाडीला 106 ते 126 जागांवर विजय मिळू शकतो, असा अंदाज या सर्वेक्षणातून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे, राज्यात लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवणाऱ्या महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता सर्वेक्षणातून दिसून येत आहे. तसंच, इतर राजकीय पक्ष किंवा अपक्षांना एकत्रित धरुन केवळ 5 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज दर्शविण्यात आला आहे. राजकीय सर्वेक्षणातून हा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी 23 नोव्हेंबर रोजीच अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे ते महत्वाचं.

मराठवाड्यात काय स्थिती

या सर्वेक्षणातून राज्यातील विभागीय निकालाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार, पश्चिम महाराष्ट्रातील 70 पैकी 31 ते 38 जागांवर महायुतीला यश मिळू शकते. तर, महाविकास आघाडीला 29 ते 32 जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे. विदर्भातील 62 जागांवरही महायुतीचं पारडं जड असून 32 ते 37 जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे. तर, महाविकास आघाडीला 21 ते 26 जागांवर यश मिळू शकते. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत फटका बसलेल्या मराठवाड्यातही 46 पैकी 18 ते 24 जागांवर महायुतीला यश मिळण्याची शक्यता आहे. मात्र, मराठवाड्यात महाविकास आघाडीचं पारडं जड असून येथे मविआला 20 ते 24 जागा मिळू शकतात असं अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ठाणे आणि कोकणातील 39 जागांपैकी 23 ते 25 जागा महायुतीला मिळू शकतील. तर, 10 ते 11 जागांवर महाविकास आघाडीला यश मिळेल, असा अंदाज आहे. मुंबईतील 36 जागांपैकी 21 ते 26 जागांवर महायुती आणि 16 ते 19 जागांवर महाविकास आघाडीला यश मिळेल असा सर्वेक्षणातून अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील 35 जागांवपैकी 14 ते 16 जागांवर महायुतीला यश मिळेल, आणि 16 ते 19 जागांवर महाविकास आघाडीला यश मिळेल असा अंदाज आहे. त्यामुळे, राज्यात मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात महायुतीला फटका बसण्याची शक्यता या ओपिनियन पोलमधून दिसून येते.

मतदानाच्या टक्केवारीचा अंदाज

आयएनएस आणि मॅट्रीझ पोलच्या सर्वेक्षणातून 47 टक्के मतदान महायुतीच्या पारड्यात पडू शकतं. तर, महाविकास आघाडीच्या पारड्यात 41 टक्के मतदान पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इतर पक्षांसाठी केवळ 12 टक्के मतदानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्वेक्षणातून राज्यातील विभागीय निकालाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. हे सगळ असलं तरी सध्या प्रचाराला धार आलेली आहे. राज्यात सर्वत्र राजकीय नेत्यांच्या सभा सुरू आहेत. त्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या नेत्यांनी जोरदार आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडायला सुरूवात केली आहे. त्यामुळे येत्या 23 नोव्हेंबरला स्पष्ट होईल की कुण्याच्या पारड्यात किती मत अन् किती जागा मिळाल्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube