Sameer Wankhede : वानखेडेंचा पाय आणखी खोलात; ‘ईडी’कडून मनी लाँड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल

Sameer Wankhede : वानखेडेंचा पाय आणखी खोलात; ‘ईडी’कडून मनी लाँड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल

Sameer Wankhede : एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे आता (Sameer Wankhede) ईडीच्या रडारवर आले आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याच्याध धरतीवर ईडीने हा गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने वानखेडे आणि इतरांविरुद्ध कार्डिलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणी भ्रष्टाचार आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. समीर वानखेडे हे अमली पदार्थांविरोधात कारवाई करून चर्चेत आले होते. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ऑक्टोबर 2021 मध्ये अमली पदार्थ प्रकरणात अटक करण्यात आली होती. मात्र कालांतराने त्याला क्लीन चीट देण्यात आली होती. या प्रकरणानंतर वानखेडे यांच्यावर मात्र अनेक आरोप केले जात होते.

आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयने मागील वर्षी मे महिन्यात गु्न्हा दाखल केला होता. त्यानंतर आता ईडीनेही गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर समन्स पाठवून त्यांना चौकशीसाठीही बोलवण्यात येईल, अशी माहिती मिळत आहे. ईडीच्या या कारवाईविरोधात समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे, असे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

Video : ‘आय विश’ म्हणत राज्यातील ड्रग्ज कारवाईत समीर वानखेडेंची एन्ट्री; फडणवीसांवरही केले भाष्य

कार्डिलिया क्रूजवर छापा टाकला गेला त्यावेळी समीर वानखेडे मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) मध्ये झोनल डायरेक्टर या पदावर कार्यरत होते. यावेळी आर्यन खान याला ड्रग्स प्रकरणातून मुक्त करण्यासाठी लाच शाहरुख खानकडे मागितल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यासह आणखी चार जणांवर ठेवण्यात आला होता.

समीर वानखेडे हे NCB च्या मुंबई विभागीय संचालक पदावर असताना त्यांच्या पथकाने ऑक्टोबर 2021 मध्ये मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझ जहाजावर छापा टाकला होता. या कारवाईत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आले. कॉर्डेलिया क्रूज शिपवर रेव्ह पार्टी सुरू असताना तिथं अंमली पदार्थ असल्याची माहिती वानखेडेंच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून त्यांनी या शिपवर धाड टाकली होती.

सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआर प्रकरणात समीर वानखेडे यांची आधीच चौकशी झाली आहे. वानखेडे यांनी सीबीआयचे आरोप फेटाळून लावले होते. सीबीआयकडून कारवाई न होण्याबाबत याअगोदरच उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांना दिलासा दिलेला आहे.

मोठी अपडेट! कार्डिलिया क्रूजप्रकरणी समीर वानखेडेंना दिलासा; नेमकं प्रकरण काय?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube