Blog : शिंदे आणि अजितदादांचा हात सोडणे हेच ‘भाजपच्या’ फायद्याचे…

Blog : शिंदे आणि अजितदादांचा हात सोडणे हेच ‘भाजपच्या’ फायद्याचे…

महायुतीतून लोकसभा निवडणुकीत दणका बसल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील (Maharashtra) भाजपच्या (BJP) नेत्यांच्या मनात कमालीची चलबिचल सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde), अजित पवार (Ajit Pawar) असे बडे नेते आणि त्यांचे पक्ष सोबत असतानाही महायुतीला येणकेन प्रकारे 17 जागाच मिळवता आल्या. यातूनच आता महाराष्ट्र भाजपच्या गोटातून 2014 च्या विधानसभा निवडणुकीप्रमाणेच यंदाची निवडणूकही स्वबळावर लढविण्याबाबत चिंतन सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजपच्या नेत्यांच्या मनात घोळत असलेला हा विचार प्रत्यक्षात आल्यास एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पण भाजप नेत्यांच्या मनात नेमका हा विचार का सुरु झाला? फक्त लोकसभेतील पराभवच या विचारासाठी कारणीभूत आहे का? याच प्रश्नाची उत्तरे आपण पाहणार आहोत… (Is the BJP thinking of contesting the 2024 Maharashtra Assembly elections on its own?)

लोकसभा निवडणुकीत राज्यात 45 पारचा नारा देणाऱ्या महायुतीला अवघ्या 17 जागा जिंकता आल्या. यातही 28 जागा लढवणाऱ्या भाजपला फक्त नऊच जागा जिंकता आल्या. तब्बल 19 उमेदवार पराभूत झाले. या धक्क्यातून सावरत भाजपने विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला विधानसभेच्या 164 हून अधिक मतदारसंघात मताधिक्य मिळाले आहे. तर महायुती केवळ 128 विधानसभा मतदारसंघात पुढे आहे. आता विधानसभेच्या 288 जागांपैकी शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रत्येकी किमान 80 जागांची मागणी करण्याच्या तयारीत आहे. यात बार्गेनिंग होऊन त्यांना किमान प्रत्येकी 70 जागा दिल्या तरी भाजपच्या वाट्याला केवळ 148 जागा येतात.

काँग्रेसला झटका अन् हरयाणात होणार ‘खेला’? राज्यसभेच्या दहा जागांचं पॉलिटिक्स काय…

भाजपची खरी चिंता इथेच आहे. लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या 40 पैकी 17 आमदारांच्या मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर राहिले. तर अजितदादांच्या 39 पैकी 30 आमदारांच्या मतदारसंघात आघाडीने बाजी मारली. शिंदे आणि अजितदांदाच्या पक्षाचा स्ट्राईकरेट असाच राहिला तर दोघांच्या मिळून 40 जागाही टप्प्यात येत नाहीत. तर भाजपच्या सध्याच्या 105 पैकी 40 मतदारसंघात महायुतीचे उमेदवार पिछाडीवर राहिले. अशात भाजपने 148 जागा लढविल्या तर 100 चा आकडा पार करणे कठीण आहे. एकत्रित केल्यास बहुमतापासून महायुती कोसो दूर राहते.

भाजपला दुसरी चिंता आहे ती मराठा, मुस्लिम आणि दलित मतांची. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मराठा, मुस्लिम आणि दलित समाजाची मते मिळाली. तर ओबीसी मतांवर महायुतीला 17 जागाच जिंकता आल्या. अजित पवार यांनी भाजपची साथ दिल्याने राष्ट्रवादीपासून ही मते दुरावली असे काही पत्रकारांचे निरिक्षण आहे. आता विधानसभेला ही मते पुन्हा महाविकास आघाडीकडे जाऊ शकतात. त्याऐवजी अजित पवार यांना स्वतंत्र लढविल्यास ते महाविकास आघाडीच्या मतांमध्ये विभागणी करु शकतात. या विभागणीचा भाजपला फायदा होईल असा भाजपच्या नेत्यांचा होरा आहे.

मला खासदार व्हायचंय हे नक्की पण, माझ्यावर अन्याय झाला का? हे अजितदादाच सांगतील

ज्या प्रमाणे अजित पवार यांना मूळ राष्ट्रवादीच्या मतदारांनी नाकारले तसेच मूळ शिवसेनेची मते शिंदेंना घेता आली नाहीत. त्यांचे जरी सात खासदार निवडून आले असले तरी भाजप आमदाराच्या मताधिक्यामुळे त्यांचे खासदार निवडून आले, असा भाजपचा दावा आहे. याशिवाय शिंदे गटाच्या आमदारांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत गद्दार म्हणून आघाडी कडून प्रचार केला जाईल, त्याला कसे तोंड द्यायचे असा प्रश्न सतावत आहे. या सगळ्या गणितांमुळेच बहुरंगी लढती झाल्यास आपल्या फायद्याचे ठरेल, असे भाजपला वाटते. यामुळेच भाजप विधानसभेला स्वबळावर निवडणूक लढवेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube