काँग्रेसला झटका अन् हरयाणात होणार ‘खेला’? राज्यसभेच्या दहा जागांचं पॉलिटिक्स काय…
Rajya Sabha By Elections : राज्यसभेच्या दहा जागांसाठी लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. राज्यसभेतील सदस्य लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याने या जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीसाठी राज्यसभा सचिवालयाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तसं पाहिलं तर सर्व दहा जागांवर एनडीए आघाडीचा विजय निश्चित मानला जात आहे. पण तरीही हरयाणातील निवडणुकीकडे लक्ष राहणार आहे. याचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीआधी या राज्यात बरीच उलथापालथ झाली होती. अपक्ष आमदारांनी राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे.
महाराष्ट्रात सुद्धा वेगळ्या घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथे राज्यसभेची एक जागा बिनविरोध झाली आहे. या जागेसाठी गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात एकही अर्ज आला नाही. त्यामुळे सुनेत्रा पवार बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले.
लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर राज्यसभेतील दहा खासदारांनी राजीनामा दिला आहे. यातील सात जागा भाजप, दोन जागा काँग्रेसच्या तर एक जागा राजदकडे होती. राज्यसभेच्या पोटनिवडणुका वेगवेगळ्या होतात. म्हणजे प्रत्येक जागेसाठी वेगळे मतदान घेतले जाते. म्हणूनच सत्ताधारी पक्ष नेहमीच या निवडणुका जिंकत आला आहे. त्यामुळे या सर्व दहा जागांवर भाजपाचा विजय निश्चित मानला जात आहे. जर या सर्व जागा भाजपने जिंकल्या तर एनडीए राज्यसभेत बहुमताच्या आणखी जवळ जाईल.
“अहंकाऱ्यांना प्रभू श्रीरामांनी 240 वरच रोखलं”; आरएसएस नेत्याचा भाजपला खोचक टोला
राज्यसभेच्या पोटनिवडणुकीचं गणित काय?
दहा जगांमध्ये महाराष्ट्र, आसाम आणि बिहार मध्ये प्रत्येकी दोन जागा आहेत. हरयाणा, राजस्थान, मध्यप्रदेश आणि त्रिपुरामध्ये प्रत्येकी एक जागा आहे. सत्तेत असल्याने एनडीए महाराष्ट्र, आसाम, त्रिपुरा, राजस्थान, हरयाणा येथील जागा जिंकण्याची शक्यता आहे. एनडीएमध्ये कोणतीही फूट पडली नाही तर या जागा जिंकण्यात जास्त अडचणी राहणार नाहीत. या सगळ्यात हरयाणामध्येच एनडीएचे गणित गडबडू शकते अशी शक्यता आहे.
हरियाणात ‘खेला’ होणार, भाजपचं गणित बिघडणार?
हरयाणातील 90 जागांच्या विधानसभेत सध्या 87 आमदार आहेत. बहुमतासाठी 44 संख्या महत्वाची आहे. भाजपचे 41, काँग्रेसचे 29, जेजेपी पक्षाचे 10 आणि पाच अपक्ष आमदार आहेत. एक आयएनएलडी आणि एक आमदार एचएलपी पक्षाचा आहे. यातील एक अपक्ष आणि एचएलपी आमदाराचा भाजपला पाठिंबा आहे. अशा पद्धतीने एनडीएचे 43 आमदार आहेत. बाकीच्या चार अपक्ष आमदारांपैकी तीन आमदारांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. सद्यस्थितीत भाजपला जेजेपीच्या दोन आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. एकूणच राज्यसभेच्या या निवडणुकीत हरयाणातील प्रत्येक आमदारावर नजर राहणार आहे. यानंतर राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत आमदार गट बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सहा जागा गमावल्या, मतं घटली तरीही भाजपला गुडन्यूज; बंगालच्या निवडणुकीत काय घडलं ?
काँग्रेसला दोन जागांचा फटका ?
राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत सर्व जागा भाजप-एनडीए आघाडीला जाण्याची शक्यता आहे. कारण ज्या राज्यात या पोटनिवडणुका होणार आहेत तिथ एनडीएचे सरकार आहे. यामुळे काँग्रेसला दोन जागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे राज्यसभेतील केसी वेणुगोपाल आणि दीपेंद्र हुड्डा लोकसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. वेणुगोपाल राजस्थानातून राज्यसभेचे खासदार आहेत तर हुड्डा हरियाणातून राज्यसभेचे खासदार आहेत. या दोन्ही राज्यात सध्या भाजप बहुमतात आहे.