शिवसेनेच्या शिलेदाराविरोधात तटकरे, भाजपची मोर्चेबांधणी : कोंडी फोडण्याचे CM शिंदेंपुढे आव्हान
एकनाथ शिंदेंचे बंड झाले. त्यांच्यासोबत कोकणातील नऊ आमदार होते. कोकण हा शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला समजला जातो. मात्र तिथूनही शिंदेंना एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदारांनी साथ दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी (NCP) असलेली आघाडी आपल्या मतदारसंघात आपल्याच मुळावर येईल, अशी भीती या आमदारांना असल्याने हे आमदार शिंदेंसोबत गेल्याचे स्पष्ट झाले होते. आता हीच भीती शिवसेनेच्या या आमदारांना पुन्हा जाणवायला लागली आहे. फरक फक्त काँग्रेसच्या जागी भाजप आणि एकसंध राष्ट्रवादीच्या जागी अजित पवारांचा गट आहे. (Ajit Pawar’s group and BJP are creating situation against Shiv Sena MLA Mahendra Thorve)
ही भीती जाणवणारे कोकणातील कर्जत-खालापूरचे आमदार आहेत महेंद्र थोरवे.
2014 ची निवडणूक शेकापमधून अगदी थोडक्यात पराभूत झालेले थोरवे 2019 च्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेत दाखल झाले. पक्षप्रमख उद्धव ठाकरेंनी खांद्यावर भगवा दिला अन् थोरवे कामाला लागले. तीनवेळा आमदार राहिलेल्या सुरेश लाड यांचा आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ताब्यात घेण्याचे आव्हान त्यांनी स्विकारले. निकाल लागल्यावर थोरवेंनी लाड यांचा दणदणीत मतांनी पराभव केला. लाखभर मते घेत मतदारसंघात पुन्हा सेनेचा भगवा फडकवला.
Manoj Jarange : ‘नोटीसा देण्याच्या भानगडीत पडू नका, आरक्षण घेतल्याविना’..; जरांगेंचा स्पष्ट इशारा
त्यानंतरच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. रायगडमध्ये सुनील तटकरे आणि सुरेश लाड यांच्यातील मधुर राजकीय संबंधांमध्ये मिठाचा खडा पडला. तटकरेंच्या कुरापतींमुळेच आपला पराभव झाला, असा उघड आरोप लाड यांनी करायला सुरुवात केली. त्यातून त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामाही दिला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची समजूत काढली. त्यानंतर लाड राष्ट्रवादीतच थांबले पण अज्ञातवासात गेले.
इकडे तटकरेंनी, मुलगी अदिती तटकरे आणि मुलगा अनिकेत तटकरे यांनी सुधाकर घारे यांना ताकद देण्यास सुरुवात केली. घारे यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद देऊन त्यांना राजकीय आणि आर्थिक पाठबळ दिले. त्यामुळे लाड नाराज असल्याचे बोलले जात होते. तटकरे यांनी त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले, पण त्याची नाराजी काही दूर होऊ शकली नाही. तिथपासूनच ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सतत सुरू होत्या. मध्यंतरीच्या काळात तटकरेंनी अजितदादांची साथ दिली, तर लाड शरद पवार यांच्यासोबतच थांबले. पण शरद पवार गटाच्या जिल्ह्यातील मर्यादा लक्षात घेत नुकताच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
काँग्रेस नेते सुनील केदार अडचणीत! नागपूर जिल्हा बँकेच्या 150 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात दोषी
पण त्यांचा हा प्रवेश म्हणजे भाजप आणि तटकरेंनी मिळून थोरवेंविरोधात मोर्चेंबांधणी करायला सुरुवात केली असल्याचे बोलले जात आहे. कारण एका बाजूला तटकरे कुटुंबीय सुधाकर घारे यांना ताकद देत आहेत. तर दुसऱ्या बाजूला लाड यांना पक्षात घेऊन भाजपने तगडा उमेदवार शोधला आहे. शिवाय गत विधानसभा निवडणुकीपूर्वी, शिवसेनेचे माजी आमदार देवेंद्र साटम भाजपमध्ये दाखल झाले आहेत.
जिंकून येण्याची क्षमता, तगडी आर्थिक ताकद आणि मतदारसंघातील पक्षीय समीकरणे असे विविध निकष भाजपकडून जागा वाटप आणि तिकीट वाटपावेळी लावले जाणार आहेत. त्यामुळे एका बाजूला राष्ट्रवादी, तटकरे आणि घारे तर दुसऱ्या बाजूला भाजप आणि दोन माजी आमदार. या दोन्ही पक्षांचे हे वाढते प्रस्थ जिल्ह्यात शिवसेनेला आणि मतदारसंघात थोरवे यांना अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. थोरवे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते. आता ही कोंडी फोडून मतदारसंघ ताब्यात ठेवणे आणि जिंकून येणे अशी दुहेरी अडचण त्यांच्यासमोर असणार हे निश्चित. या बदलेल्या राजकीय समीकरणांमध्ये आता नेमका कोणचा विजय होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.