Maratha Reservation : ‘यापैकी’ एका कागदावर नोंद सापडल्यास मिळणार ‘कुणबी’ प्रमाणपत्र
पुणे : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठीचे पुरावे गोळा करण्यासाठी स्थापन केलेल्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे (Sandeep Shinde) यांच्या समितीने आता राज्यभर काम सुरु केले आहे. यासाठी जिल्हास्तरावर समित्या आणि कक्ष स्थापन केले आहे. या समितीची जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या नेतृत्वात नुकतीच बैठक पार पडली. यावेळी गतीने हे काम करावे, संबंधित विभागांनी या कामासाठी पूर्णवेळ अधिकाऱ्याची नेमणूक करावी, मागासवर्गीय आयोगाकडून काही माहिती मागविल्यास तातडीने उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
दरम्यान, मराठवाड्यातील नोंदी शोधताना निजामकालिन पुराव्यांचा आधार घेण्यात आला होता. मात्र आता उर्वरित महाराष्ट्रातील पुरावे शोधताना विविध प्रकारच्या कागदपत्रांचा आधार घेतला जाणार आहे. या कामासाठी सन 1967 पूर्वीचे महसुली पुरावे लक्षात घेण्यात येत आहेत. मात्र या कागदपत्रांमधील बहुतेक नोंदी मोडी लिपीत असल्याने त्या तपासण्यासाठी पुराभिलेख संचालनाकडून प्रशिक्षितांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. (Kunbi certificate to the Maratha community, various types of documents will be taken as support)
सोबत आला, ठाकरेंना भिडला… आता थेट राज्यमंत्र्याचा दर्जा; शिलेदाराला CM शिंदेंचे गिफ्ट
समिती कोणते कागदपत्र तपासणार?
खासरा पत्रक, पाहणी पत्रक, क-पत्रक, कुळ नोंदवही, नागरिकांचे राष्ट्रीय रजिस्टर सन १९५१, नमुना क्रमांक एक हक्क नोंद पत्रक, नमुना क्रमांक दोन हक्क नोंद पत्रक आणि सातबारा उतारा, जन्म-मृत्यू नोंदी अभिलेख (गाव नमुना १४), शैक्षणिक अभिलेख्यामध्ये प्रवेश निर्गम नोंदवही/जनरल रजिस्टर, रेल्वे पोलीस विभागाकडील गुन्ह्याबाबतच्या नोंदी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्याकडील माजी सैनिक निवृत्तीनंतर नोंदणीकरिता आलेली कागदपत्रे, जिल्हा वक्फ अधिकारी यांचेकडील मुंतखब, १९६७ पूर्वीचे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक, महापालिका, नगरपालिकेकडील शेतवार तक्ता वसूल आणि आमदनी नोंदवही आदी कागदपत्रे तपासण्यात येणार आहेत.
तब्बल 32 वर्ष लढला अन् विजयाचा गुलाल उधळला; अरणगावात लंकेंचा विखे-कर्डिलेंना धक्का!
याशिवाय सैन्यभरती कार्यालयाकडील सैन्य भरतीवेळी घेतलेल्या नोंदी, अधीक्षक राज्य उत्पादनशुल्क यांचेकडील अनुज्ञप्ती नोंदवह्या, मळी नोंदवही, ताडी नोंदवही आणि आस्थापना कागदपत्रे, कारागृह अधीक्षकांकडील कच्चे आणि गुन्हे सिद्ध झालेल्या कैद्यांच्या नोंदवह्या, पोलीस विभागाकडील गाववारी, गोपनीय रजिस्टर, गुन्हे अभिलेख, अटक पंचनामे, प्रथम माहिती अहवाल अभिलेख, सहायक मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडील खरेदीखत नोंदणी केलेले अभिलेख, डे-बुक, करारखत, साठेखत, इसारा पावती, भाडे चिठ्ठी, ठोके पत्र, बटाई पत्र, दत्तक विधान, मृत्युपत्र, इच्छापत्र, तडजोड पत्र, पक्का बुक, शेतवार पत्रक, वसुली बाकी, टिपण बुक तपासण्यात येणार आहेत.