मोदींना अटक होण्यापासून शरद पवारांनी वाचवलं; संजय राऊतांचा पुस्तकात खळबळजनक दावा
२३ मार्च रोजी सायंकाळी राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत हेच पुस्तक 'अनलाइकली पॅराडाईज' हे संजय राऊत यांचं पुस्तक प्रकाशित झालं.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे पुस्तक नरकातला (Sanjay Raut) स्वर्ग या पुस्तकात धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. गुजरातमध्ये गोधरा दंगलीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर चौकशीचा कडेकोट ससेमिरा सुरू असताना, त्यांना केंद्रातील यूपीए सरकारपासून वाचवण्यात शरद पवारांची निर्णायक भूमिका होती, असा दावा खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे. दरम्यान, २३ मार्च रोजी सायंकाळी राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत हेच पुस्तक ‘अनलाइकली पॅराडाईज’ (Unlikely Paradise) या नावाने इंग्रजी आणि हिंदीमध्येही प्रकाशित करण्यात आलं आहे.
राऊत यांनी आपल्या पुस्तकात शिवसेनाप्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांनी अमित शाह यांनाही वाचवले असल्याचा दावा केला. संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकात म्हटले की, नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रात यूपीए सरकार होते आणि त्यांच्याविरुद्ध सीबीआयसह अनेक तपास संस्थांनी कारवाईचा मोर्चा उघडला होता. त्या काळात मोदींच्या सरकारमधील अनेक पोलिस अधिकारी तसेच तत्कालीन गृह राज्यमंत्री अमित शाह यांना अटक झाली होती. खुद्द नरेंद्र मोदी यांनाही अटक होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प मुंबईतील मिठी नदीवर करा, पंतप्रधान मोदींवर संजय राऊतांची टीका
संजय राऊत यांनी म्हटले की, या निर्णायक टप्प्यावर केंद्र सरकारमधील तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांनी एका मंत्रिमंडळ बैठकीत ठाम भूमिका घेतली. “लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या कोणत्याही मुख्यमंत्र्याला अटक करून तुरुंगात डांबणं योग्य नाही, असं परखड मत त्यांनी व्यक्त केलं. या भूमिकेला अनेक मंत्र्यांची मूक संमती मिळाल्याने, मोदी यांची अटक थांबली, असा थेट दावाही राऊतांनी यामध्ये केलेला आहे.
अमित शहा यांच्यावरील खुनाच्या प्रकरणातही सीबीआयच्या एका विशेष पथकाने जामिनाला कडाडून विरोध केला होता. त्या पथकात महाराष्ट्र केडरचे एक वरिष्ठ अधिकारी होते. मात्र, नरेंद्र मोदी यांनी स्वतः शरद पवार यांची मदत मागितली आणि पवारांनीही आपल्या स्वभावानुसार हस्तक्षेप करत, अमित शहा यांना जामीन मिळवून दिला असल्याचा दावा राऊत यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.