‘आम्ही हिंदूच…’ मुलाचं नाव ‘जहांगीर’ ठेवल्यानं चिन्मय मांडलेकर ट्रोल; संतापलेल्या पत्नीनं सांगितला अर्थ अन् जात

‘आम्ही हिंदूच…’ मुलाचं नाव ‘जहांगीर’ ठेवल्यानं चिन्मय मांडलेकर ट्रोल; संतापलेल्या पत्नीनं सांगितला अर्थ अन् जात

Chinmay Mandlekar News : मराठी आणि हिंदी चित्रपटांत आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर नावारुपास आलेला अभिनेता चिन्मय मांडलेकर. मराठी चित्रपटसृष्टीत अनेक ऐतिहासिक भूमिका चिन्मयने साकारल्या आहेत. त्याच्या अभिनयाचे कौतुकही होत असते. परंतु, तो आणि त्याची पत्नी नेहा मांडलेकर एका वेगळ्याचा कारणाने ट्रोल होत आहेत. ट्रोलर्सच्या टीकेचा त्यांना सामना करावा लागत आहे. या प्रकाराला कारण ठरलंय त्यांच्या मुलाचं नाव.

चिन्मय मांडलेकरने एका मुलाखतीत त्याच्या मुलाचं नाव जाहीर केलं होतं. यावरून त्याच्या पत्नीला सोशल मीडियात प्रचंड ट्रोल करण्यात आलं. या ट्रोल्सला आता चिन्मयची पत्नी नेहाने सडेतोड उत्तर दिले आहे. विशेष म्हणजे, मुलाचं नाव जहांगीर का ठेवलं या प्रश्नाचं उत्तरही तिनं दिलं आहे. जहांगीर या शब्दाचा अर्थ जगज्जेता असल्याचं तिनं आपल्या इन्स्टाग्राम व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

Chinmay Mandlekar: चिन्मय मांडलेकरच्या ‘गालिब’ नाटकात ‘या’ दमदार कलाकारांची मुख्य भूमिका

नेहा मांडलेकरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत तिने मुलाचं नाव जहांगीर का ठेवलं याचा खुलासा केला आहे. तसेच तिने आपल्या जातीचाही उल्लेख केला आहे. यात त्या म्हणतात, नमस्कार माझं नाव नेहा जोशी मांडलेकर. माहेरकडून मी देशस्थ ब्राह्मण आहे. सासरकडून त्वष्टा कासार आहे. मी हिंदू आहे. माझे पती त्यांचं नाव चिन्मय दीपक मांडलेकर. त्यांची जात त्वष्टा कासार आणि तेही हिंदूच आहेत.

मागील काही दिवसांपूर्वी माझ्या नवऱ्याने एका पॉडकास्टला मुलाखत दिली होती. या मुलाखतीनंतर आम्ही ट्रोलिंगला सामोरं जातो. माझे पती पब्लीक फिगर आहे. त्यांचं काम आवडलं तर प्रेक्षक डोक्यावर घेतात. काम नाही आवडलं तर कानउघाडणी करण्याचाही अधिकार त्यांना आहे. पण, सध्या कामाबद्दल नाही तर आमच्या मुलाच्या नावावरून आम्हाला या ट्रोल्सचा सामना करावा लागत आहे.

हा व्हिडिओ एवढ्यासाठीच करतेय की त्या मुलाला एक आई सुद्धा आहे. जी कलाकार नाही. तिला तिच्या मुलांची प्रायव्हसी जपण्याचा पूर्ण हक्क आहे. ज्या व्यक्तीबद्दल लिहीलं जातंय तो एक दहा-अकरा वर्षांचा मुलगा आहे. बरं का ट्रोल होतंय? तर त्याचं नाव जहांगीर आहे. पण नाव कधी ठेवलं हेही सांगते कारण लोकांचं अज्ञान दूर करावं म्हणून हा खटाटोप करतेय.

आजपर्यंत 12 वेळा त्यांचे नाव चर्चेत आलेले अन् डावललेले पाहिले आहे : चिन्मय भांडारींनी मांडली वडिलांची व्यथा

जहांगीर हे नाव पर्शियन आहे. माझ्या मुलाचा जन्म 21 मार्च 2013 ला झाला. 21 मार्च या दिवशी जमशेदी नवरोज असतो. या दिवशी मुलाचं नाव आम्ही जहांगीर असं ठेवलं. या नावाचा अर्थही फार सुंदर आहे. जहांगीर म्हणजे जगज्जेता. जग जिंकलेला जहांगीर.

भारतरत्न जेआरडी टाटा यांचं नावही जहांगीर आहे. नावाचा अर्थ आम्हाला आवडला. अनेक पालक असे आहेत ज्यांना नावाचा अर्थ आवडला तर ते मुलांची असे अर्थपूर्ण नाव ठेवतात. अनेक जण असंही सांगतात की जगज्जेता तर मग पृथ्वीराज नाव का नाही ठेवलं किंवा विक्रमादित्य का नाही ठेवलं. त्याचेही अर्थ असे होतात. तो हक्क पालक म्हणून तुम्हाला असावा.

आमच्या मुलाच्या नावावरून आम्हाला टोकाचं ट्रोल केलं जातंय. स्वतंत्र भारतात आम्ही काय नावं ठेवली पाहिजेत हा आमचा अधिकार आहे. आम्ही भारताचे नागरिक असून आम्हाला सार्थ अभिमान आहे, असेही नेहा मांडलेकर यांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube