महाविकास आघाडीचं जागावाटप कसं होणार? अजितदादांनी दिला महत्वाचा अपडेट
Ajit Pawar on Lok Sabha Seat Sharing : राज्यात लोकसभा निवडणुकांचे पडघम जोरात वाजू लागले आहेत. राजकीय पक्षांकडून जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे. कोणत्या जागा कोणासाठी जास्त फायदेशीर ठरतील याचाही विचार सुरू आहे. त्यातच मतदारसंघांबाबत राजकीय नेत्यांकडून केल्या जात असलेल्या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडी तसेच शिंदे-भाजपात खटके उडत असल्याच्याही बातम्या येत आहेत. या सगळ्या पार्श्वभुमीवर अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे.
महाराष्ट्रात असं आधी कधीच घडलं नाही, अजितदादांनी नेमकं काय सांगितलं?
पवार म्हणाले, निवडणुकांसंदर्भात तिन्ही पक्षांची मानसिकता झाली आहे. शिवसेनेने मागील निवडणुकीत जिंकलेल्या 18 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 आणि काँग्रेसची 1 जागा बाजूला ठेऊन अन्य जागांवर चर्चा केली जाणार आहे. सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख मुंबईत येतील त्यावेळी बैठक घेऊन निर्णय घेऊ. आघाडीतील अन्य मित्रपक्षांच्या जागावाटपाबाबत पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जे मित्र पक्ष आहेत त्यांना राष्ट्रवादीने सामावून घ्यावे. तसेच काँग्रेस आणि शिवसेनेनेही करावे, असे माझे मत असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे जागावाटपाचे अजून काहीच ठरलेले नाही. आघाडीत हे तीन प्रमुख पक्ष आहेत. तसेच आणखीही काही मित्र पक्ष आहेत. त्यामुळे जागा वाटप करताना नेत्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी तर आताच जिंकलेल्या सगळ्याच जागांवर दावा ठोकला आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेते नाराज आहेत. त्यांच्याकडूनही वक्तव्ये दिली जात आहेत. अशा परिस्थितीत जागा वाटपाचा निर्णय झाल्यानंतर वाद होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
मुंबईत बेसिक गोष्टी मिळेनात अन् नाईट लाईफ… श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर घणाघात
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही भाजप आणि शिंदे गटातील जागा वाटपावर भाष्य केले होते. ते म्हणाले, भाजप-सेना युतीचं केंद्रीय बोर्ड ठरवतं. स्थानिक पातळीवर कुणालाच काही अधिकार नाही. शिंदे फडणवीस यांची चर्चा होईल. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल त्यानंतरच आमचा जागावाटपाचा निर्णय होईल.