मोठी बातमी! महाराष्ट्रात साखर उत्पादनात मोठी घट, देशातही उत्पादन 17 टक्क्यांनी घटलं; कारण काय?

Sugar Production in India : देशभरात साखरेचं उत्पादन घटलं (Sugar Production) आहे. यामागे नेमकी कोणती कारणे आहेत. महाराष्ट्रात साखर उत्पादनाची काय स्थिती आहे याची माहिती आता समोर आली आहे. खरंतर निवडणूक, अनियमित हवामान, उसावर अकाली आलेला फुलोरा आणि रोगांचा प्रादुर्भाव या कारणांमुळे देशातील साखर उत्पादनात जवळपास 17 टक्के घट झाली आहे. तसेच महाराष्ट्रातील साखर उत्पादनात तर 25 ते 30 टक्क्यांची घट झाली आहे.
महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) साखरेचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. अन्य राज्यांतही साखरेचे उत्पादन होते. परंतु, मागील आर्थिक वर्षात सर्वच ठिकाणी साखरेच्या उत्पादनात घट झाली आहे. देशातील एकूण 290 लाख टनाच्या तुलनेत यंदा 241 लाख टन इतके साखर उत्पादन घेता आले आहे. या हंगामात 534 कारखान्यांपैकी 380 कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. मागील वर्षात याच दिवशी 534 कारखान्यांपैकी फक्त 240 कारखाने बंद झाले होते.
राज्यात साखर उत्पादनात मोठी घट
महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांना मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्रात 838 लाख टन उसाचे गाळप झाले असून मागील हंगामात झालेल्या 1030 लाख टनापेक्षा ते 18.65 टक्क्यांनी कमी आहे. यंदा 79.20 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. मागील वर्षाचा विचार केला तर 105 लाख टनांपेक्षा 24 टक्क्यांनी कमी आहे. राज्यातील 200 पैकी 180 कारखाने बंद झाले आहेत. मागील वर्षात ही संख्या फक्त 103 इतकी होती अशी माहिती राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
एकरकमी एफआरपीच्या याचिकेत अचानक साखर संघाची हस्तक्षेप याचिका; राजू शेट्टी यांचा कडाडून विरोध
उत्तर प्रदेशातही साखर कडू..
उत्तर प्रदेशचा विचार केला तर या राज्यात उसाचे एकूण गाळप 875 लाख टन झाले असून ते मागील वर्षी 876 लाख टन होते. मागील वर्षात राज्यातील साखर उत्पादन 92 लाख टन इतके झाले होते. यावर्षीची आकडेवारी पाहिली तर उत्पादनात घट झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. यंदा फक्त 84 लाख टन उत्पादन झाले आहे. उत्पादनात घट झाल्यामुळे एस ग्रेड साखरेची किंमत 3780 ते 3830 रुपये प्रति क्विंटल आणि एम ग्रेड साखरेची किंमत 3965 ते 4100 रुपये प्रति क्विंटल आहे. इथेनॉलच्या उत्पादनातही मोठी प्रगती झाली आहे. आजमितीस 303 कोटी लिटर इथेनॉल पेट्रोल मिश्रणासाठी वापरण्यात येत आहे, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.