करमाळ्यात शिंदेंना तर धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का; माजी मंत्र्यांचा मुलगा हाती घेणार भाजपाचा झेंडा
Maharashtra Elections 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत महायुती आणि काँग्रेसला धक्का देणाऱ्या (Elections 2024) बातम्या आल्या आहेत. महायुतीतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला माढा लोकसभा दुसरा धक्का बसला आहे. माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्यानंतर करमाळ्याचे तालुकाप्रमुख देवानंद बागल यांनीही शिंदेंना जय महाराष्ट्र केला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसलाही जबर दणका बसला आहे. धाराशिव जिल्ह्यातील काँग्रसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण आजच भाजपात प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे.
Sangli Lok Sabha : कॉंग्रेसच्या हालचाली वाढल्या! विशाल पाटलांची बंडखोरी थांबवू; थोरातांचं वक्तव्य
करमाळा तालुका माढा लोकसभा मतदारसंघात येतो. या तालुक्यात आधी माजी आमदार नारायण पाटील यांनी राजीनामा देत शिंदेंना धक्का दिला होता. त्यानंतर आता करमाळा तालुकाप्रमु देवानंद बागल यांनीही शिंदेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बागल लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देतील आणि शरद पवार गटात सहभागी होतील असे सांगितले जात आहे.
देवानंद बागल माजी आमदार नारायण पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनीही शिंदेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. या घडामोडींमुळे माढ्यातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडणुकीत याचा फायदा होणार आहे.
धाराशिवमध्ये काँग्रेसला खिंडार, माजी मंत्र्यांचा मुलगा भाजपात
धाराशिवमध्ये काँग्रेसला खिंडार पडलं आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला जिल्ह्यात गळती लागली आहे. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण काँग्रेसचा हात सोडून भाजपात प्रवेश करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत चव्हाण यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगितले जात आहे. सुनील चव्हाण महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव आहेत.
जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये विविध पदांवर त्यांनी काम केलं आहे. धाराशिवमध्ये आज महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याच दरम्यान सुनील चव्हाण भाजपात प्रवेश करतील, अशी माहिती मिळाली आहे. सुनील चव्हाण यांच्या ताब्यात असलेल्या सहकारी संस्था, साखर कारखाना, सूतगिरणी या सर्व संस्था डबघाईला आल्या आहेत. कर्जबाजारी झाल्या आहेत. अशा परिस्थितीत या संस्थांना वाचविण्यासाठी सुनील भाजपात प्रवेश करत असल्याची चर्चा आहे.
Madha Loksabha : मोहिते पाटील अन् शरद पवारांची दिलजमाई; प्रविण गायकवाडांनी सांगितलं A To Z