Anjali Damania : “आधी भुजबळ, आता बारस्करांना उभं केलं”; दमानियांचा सरकारवर हल्लाबोल
Anjali Damania Supports Manoj Jarange : राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण (Maratha Reservation) विधेयक मंजूर करण्यात आले. यानुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले. या विधेयकावर राज्यपालांची सही होताच कायद्यात रुपांतर होणार आहे. मात्र, या आरक्षणाला विरोध करत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी पुढील आंदोलनाची हाक दिली आहे. तर दुसरीकडे जरांगे पाटील यांचे एकेकाळचे सहकारी अजय महाराज बारस्कर (Ajay Maharaj Baraskar) यांनी जरांगेंवर गंभीर आरोप केले. यावरून आता राजकारण तापले आहे. बारस्कर यांनी केलेले आरोप फेटाळून लावत बदनाम करण्यासाठीचा हा सरकारचा ट्रॅप आहे, असे जरांगे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनीही मनोज जरांगे पाटील यांचे समर्थन केले आहे. जरांगे पाटील म्हणत आहेत तेच सत्य आहे, असे दमानिया यांनी म्हटले आहे.
जरणगेंनी तक्तीने लढा दिला यात काहीच शंका नाही. पण त्यांचा लढा हाणून पाडण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे असे दिसतंय.
आधी भुजबळांना उभं केलं आणि आता वाट्टेल ते बोलण्यासाठी या अजय महाराज बारसकरांना उभं केलं आहे
जे जरांगे म्हणत आहेत तेच सत्य आहे. हे १० टक्के आरक्षण कोर्टात टिकणार…
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) February 21, 2024
अंजली दमानिया यांनी एक ट्विट केले आहे. जरांगेंनी ताकदीने लढा दिला यात काहीच शंका नाही. पण त्यांचा लढा हाणून पाडण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे असं दिसतंय. आधी भुजबळांना उभं केलं आणि आता वाट्टेल ते बोलण्यासाठी या अजय महाराज बारस्करांना उभं केलं आहे. जे जरांगे म्हणत आहेत तेच सत्य आहे. हे 10 टक्के आरक्षण कोर्टात टिकणार नाही. सगळ्याच राजकारण्यांनी दगा दिला पण, शिंदेंकडून ही अपेक्षा नव्हती.
अजय महाराज बारस्करांचे आरोप काय ?
अजय बारस्कर यांनी पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटलांवर टीका केली. ते म्हणाले, मनोज जरांगे हे हेकेखोर आहेत. त्यांनी संत तुकाराम महाराजांचा अपमान केला आहे, तो मी खपवून घेणार नाही. लोक जरांगे यांना पाणी प्या सांगत होते, तेव्हा मी त्यांना पाणी द्यायला गेलो होतो. मात्र, त्यावेळी त्यांना वाटलं की, माझ्या हातातून पाणी प्यायल्याने मी मोठा होईल. म्हणून त्यांनी ते पाणी प्यायले नाहीत. संत फिंत गेले खड्ड्यात असं ते म्हणाले. आजपर्यंत जरांगेंनी स्वत: सरकारला आरक्षणाच्या संदर्भात एकही पत्र दिलेले नाही. ते रोज पलटी मारतात, अशी टीका अजय महाराज बारस्कर यांनी काल पत्रकार परिषदेत केली होती.
बारस्कर हा सरकारचा ट्रॅप, तुकाराम महाराजांच्या आडून आंदोलन संपवण्याचा डाव, जरांगेंचा पलटवार
बारस्कर हा तर सरकारचा ट्रॅप : मनोज जरांगे
अजय बारस्कर हा सरकारचा ट्रॅप आहे. हा कसला महाराज आहे, हा तर भोंदू महाराज आहे. बारस्कर यांनी तुकाराम महाराजांच्या आडून आंदोलन संपवण्याचा घाट घालत आहेत. आता फक्त पहिला समोर आला आहे, अजून पंधरा-वीस बारस्कर बाहेर येतील. मी जे बोललो, ते कुठल्या संताबद्दल बोललो नाही. तर बारस्करांबद्दल बोललो. मी त्याची मागत नाही, मी तर त्याला बोलतही नाही. तो कसला महाराज… मला पाणी पाजून त्याला मोठं व्हायचं होतं, असा टोला जरांगेंनी लगावला होता.