ठाकरेंचे ‘खंदे शिलेदार’ चौकशीच्या सापळ्यात : निवडणुकांपूर्वीचे वादळ कसे परतवून लावणार?
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची (Uddhav Thackeray) शिवसेना पुन्हा चौकशीच्या रडारवर आली आहे. सूरज चव्हाण, राजन साळवी , रवींद्र वायकर, माजी महापौर किशोरी पेडणेकर हे ठाकरे गटाचे नेते तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांना ईडीकडून अटक झाली आहे तर राजन साळवी यांच्यावर एसीबीची कारवाई सुरू आहे. महिला संघटनासाठी राज्य दौऱ्यावर निघालेल्या पेडणेकर आणि मुंबईत महत्त्वाची भूमिका बजावणारे रवींद्र वायकर रडारवर आहेत.
मुंबई महापालिकेच्या कथित खिचडी घोटाळ्यात आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे सहकारी युवासेना पदाधिकारी सूरज चव्हाण यांना ईडीने अटक केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सूरज चव्हाण यांची ‘ईडी’कडून वेळोवेळी चौकशी करण्यात येत होती. अखेर काल रात्री त्यांना अटक करण्यात आली. तर राजन साळवी यांच्या रत्नागिरी येथील घरावर एसीबीने छापेमारी सुरू केली आहे. आगामी लोकसभेत मुंबईसह कोकण अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. यात शिवसेना (उबाठा) गटाची कोंडी करण्यासाठी या कारवाया होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Uddhav Thackeray : ‘हिंदु्त्व’ हा भाजपासाठी राजकीय खेळ पण.. ; संसदेतील घटनेवरून ठाकरे गट आक्रमक
खिचडी घोटाळ्यात सूरज चव्हाण यांना अटक झाली असली तरी ते या प्रकरणात केवळ मोहरा म्हणून वापरले जातील अशीही माहिती समोर येत आहे. शिवसेनेच्या संजय राऊत (Sanjay Raut) आणि आदित्य ठाकरे यांच्या नावाचा या प्रकरणात आधीच उल्लेख आला आहे. ऐन निवडणुकीआधी सूरज चव्हाण यांचा धागा पकडून राऊत आणि आदित्य ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.
लोकसभेच्या काळात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघ महत्त्वाचे आहेत. या मतदारसंघांचे नियोजन करण्यात मातोश्रीच्या अतिशय जवळ असलेले रवींद्र वायकर अग्रभागी होते. एवढंच काय तर शिवसेनेची आर्थिक रसद संभाळाण्यात देखील वायकर यांच्यावर मोठी भिस्त होती. यामुळे वायकर हे यापूर्वीही रडारवर होते. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे वायकर यांनी अलिबागमध्ये ज्या जमिनी घेतल्या त्या ठाकरे कुटुंबियांच्या नावावर असल्याचा आरोप हा भाजप किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला होता. त्याबाबत अनेक पत्रकार परिषदांमध्ये त्यांनी कागदपत्र देखील सादर केली होती. हे पाहता वायकर यांच्यावर कारवाई करत उद्धव ठाकरे यांच्यासाठी इशारा असेल असाही एक कयास राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.
राम मंदिर उद्घाटनानंतर लोकसभेचे वारे अधिक वेगाने वाहू लागतील. महाआघाडीचे जागावाटप होताच या केंद्रीय एजन्सींच्या कारवाया अधिक कठोर होतील असेही बोलले जात आहे. आज सूरज चव्हाण अथवा वायकर किंवा राजन साळवी असले तरी ठाकरे कुटुंबावर दबाव हा एक संदेश या कारवायातून दिसून येत आहे.
Uddhav Thackeray : भुजबळांकडे पेढे तर, पटेलांकडे, अधिवेशनानंतर ठाकरेंचा प्लॅन ठरला