“CM पदासाठी चेहरा असेल तर जाहीर करा, स्वागत करू”; राऊतांनी काँग्रेसला डिवचलं
Sanjay Raut : राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत (Elections 2024) आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. उमेदवार आणि मतदारसंघांची चाचपणी सुरू आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल याचे पत्ते अजून झाकलेलेच आहेत. या मुद्द्यावर महायुतीत शांतता दिसत असली तरी महाविकास आघाडीत (MVA) मात्र धुसफूस सुरू झाली आहे. उद्धव ठाकरेंनाच (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून मविआने प्रोजेक्ट करावे असा शिवसेनेचा आग्रह आहे. मात्र शरद पवार गट आणि काँग्रेस याबाबत (Congress Party) फारसे अनुकूल नाहीत असेच दिसत आहे. एकवेळ शरद पवार गट नरमाईची भूमिका घेईलही परंतु, लोकसभा निवडणुकीत जास्त जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलेला काँग्रेस या मुद्द्यावर अनुकूलता दाखवील याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत.
यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांच्यात भुवया उंचावल्या आहेत. नाना पटोले यांची अडचण समजू शकतो. सर्वांची बाजू समजू शकतो. पटोले आमचे मित्रच आहेत. नाना पटोले यांच्या मनात एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तर त्यांनी सांगावं. पण आम्ही राज्यातील अकरा कोटी लोकांच्या मनात कोणता चेहरा आहे त्याबद्दल बोलत आहोत मला हे बोलण्याचा अधिकार आहे.
Sanjay Raut: बारामतीतून लाडक्या बहिणी अजित पवारांना पराभूत करतील; संजय राऊतांचा घणाघात
2019 मधील निवडणुकीनंतर मीच म्हणालो होतो की राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच होतील. नाना पटोलेंनी केलेलं वक्तव्यही बरोबर आहे. ते त्यांच्या जागी बरोबर आहेत. पटोले यांच्याकडे मुख्यमंत्रिपदासाठी दुसरा कोणता चेहरा असेल तर त्यांनी जरुर सांगितलं पाहिजे. काँग्रेस पक्षाकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असेल आणि त्यांनी याबाबत सांगितलं तर त्याला आमची काहीच हरकत नसेल. नाना पटोले ज्या नेत्याचं नाव सांगतील त्याचं आम्ही स्वागत करू, असे संजय राऊत म्हणाले.
काँग्रेसकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नाही असे तुम्हाला म्हणायचे आहे का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला त्यावर राऊत म्हणाले, मला असं काहीच म्हणायचं नाही. परंतु, काँग्रेसने त्यांच्याकडील उमेदवाराबाबत सांगायला हवं. ही लोकशाही आहे. त्यांच्याकडे अनेक नेते आहेत. त्यांनी या नेत्यांची नावं जाहीर करावीत. काँग्रेसने अशा किमान दहा नेत्यांची तरी नावं जाहीर करावीत असे संजय राऊत यावेळी म्हणाले.
अजित पवार विष्णूदास तर फडणवीसांमुळे मराठी माणसाला सुख नाही; संजय राऊतांचं टीकास्त्र