‘बटण कसं दाबायचं मी सांगणार नाही’, खोचक प्रत्युत्तर देत पवारांची अजितदादांवर ‘कडी’
Sharad Pawar replies Ajit Pawar : ‘या निवडणुकीत तुतारीसमोरचं बटण दाबा. काल कुणीतरी सांगितलं कसं दाबा म्हणून पण मी काही तसं सांगत नाही. त्यांनी सांगताना हेही सांगितलं की असं दाबलं तर तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. आता हे कमी पडू देणार नाही त्याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. कारण, काही देणंघेणं देऊन मतं मागण्याची आमची भूमिका नाही. इथं काम करायचं. लोकांना ताकद द्यायची. लोकांची सेवा करायची आणि मत मागायचं ही भूमिका आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खोचक प्रत्युत्तर दिलं.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी कन्हेरी येथे सभा आयोजित करण्यात आली होती. येथूनच शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराला सुरुवात केली. या सभेत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केली. तसेच अजित पवार यांच्यावरही खोचक टीका केली.
“पाकिटमार शोधा, निवडणुकीत त्याला बाजूला करा” शरद पवारांच्या निशाण्यावर मोदी-शहा
शरद पवार पुढे म्हणाले, देशाच्या संसदेत दिल्लीला पाठवल्यानंतर लोकांसाठी काम करायचं असतं. लोकांची आठवण ठेवायची असते. लोकांचे प्रश्न भाषणांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडायचे असतात. हे काम सुप्रिया सुळेंनी मागील तीन टर्ममध्ये केलं. त्यामुळे तुमच्याकडे मत मागण्याचा अधिकार सुप्रियाला आहे आणि तुम्हालाही मत द्याचचंय. पण मी आधीच सांगितलं की आता आपली खूण बदलली आहे. काही गोष्टी झाल्या. आधीची खूण वेगळी होती आता वेगळी आहे. पण तुम्ही खूण पक्की लक्षात ठेवा. या निवडणुकीत अनेक लोकं काहीतरी सांगतील पण त्याकडे लक्ष देऊ नका. आपल्याला वाद वाढवायचा नाही. आपल्याला मनापासून काम करायचंय त्यासाठी तिसरं बटण दाबा. तुतारीसमोरचं बटण दाबा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थितांना केले.
काय म्हणाले होते अजित पवार ?
लागेल तेवढा निधी देण्यासाठी आम्ही सहकार्य करू. पण जसा निधी हवा. तसेच आमच्यासाठी कचाकचा बटणंही दाबा. म्हणजे मला पण निधी द्यायला बरं वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल. असं वादग्रस्त वक्तव्य अजित पवार यांनी मतदार संघासाठी निधी देण्याबाबत केलं आहे. ते इंदापूर तालुक्यातील एका ठिकाणी प्रचार सभेमध्ये बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.
Sharad Pawar : रशियाचा पुतीन अन् भारताचे मोदी यांच्यात फरक नाही; शरद पवारांचा थेट हल्लाबोल