राज्यात पावसाचा जोर ओसरला! आज ‘या’ जिल्ह्यात मात्र जोरदार बरसणार

Maharashtra Rain : राज्यासह देशभरात पावसाचा जोर ओसरला आहे. जुलै महिन्यात मुसळधार पाऊस बरसत होता तशी परिस्थिती आता दिसत नाही. ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर कमी होईल अशी शक्यता हवामान खात्याने आधीच व्यक्त केली होती. त्यानुसार ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात बहुतांश ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे.
आज (9 ऑगस्ट) राज्यात ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. राज्यात पावसाने विश्रांती घेतलेली असताना उत्तर भारतात मात्र ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उत्तराखंडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पालघरमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच कोकणातील काही जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मुंबई पुणे यांसारख्या शहरांसह अन्य शहरांतही पावसाचा जोर ओसरला आहे. आता कुठे जोरदार पाऊस होईल अशी शक्यता दिसत नाही. जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने पाणीसाठे जवळपास भरले आहेत. त्यामुळे पाण्याची काळजी मिटली आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्य पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे.
मागील जुलै महिन्यात राज्यातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण परिसराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. नद्यांना पूर आला. शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक गावांचा संपर्क तुटला. घरात आणि शेतात पाणी साचले अशी परिस्थिती होती. त्या काळात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मुसळधार पावसाची स्थिती राज्यात निर्माण झाली होती.