तिकीटाचं नाही नक्की पण, तयारी केली पक्की; राणेंच्या नव्या खेळीने शिंदे गट अस्वस्थ

तिकीटाचं नाही नक्की पण, तयारी केली पक्की; राणेंच्या नव्या खेळीने शिंदे गट अस्वस्थ

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha : महायुतीत सर्वाधिक वादग्रस्त ठरत असलेल्या मतदारसंघापैकी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha) आहे. या मतदारसंघात उमेदवारीचा तिढा निर्माण झाला आहे. शिंदे गटाने किरण सामंत यांच्यासाठी तर भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासाठी दावा ठोकला आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांना उमेदवारी जाहीर करता आलेली नाही. मात्र, तरीही या मतदारसंघात प्रचार जोरात सुरू झाला आहे. नारायण राणे यांनी तर सभा, मेळावा अन् बैठकांचा धडाका सुरू केला आहे. आता तर राणे यांनी चार उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती हाती आली आहे. राणेंच्या या राजकीय खेळीमुळे शिंदे गटात अस्वस्थता वाढली आहे.

Narayan Rane : माझ्यावर टीका करतो, एक दिवस चोप देणार; भास्कर जाधवांना थेट नारायण राणेंची धमकी !

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात अद्याप उमेदवार निश्चित झालेला नाही. राज्य सरकारमधील उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत या मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यांनी आधीपासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. वेळप्रसंगी बंडखोरीचीही त्यांची तयारी आहे. मात्र तरीही त्यांची उमेदवारी निश्चित झालेली नाही. याचं कारण म्हणजे मंत्री नारायण राणे यांची दावेदारी. वरवर तरी हेच कारण दिसत आहे. नारायण राणे यांनी या मतदारसंघावर दावेदारी केली आहे. भाजप नेतेही यासाठी प्रयत्न  करत आहेत.

या राजकारणामुळे शिंदे गटात अस्वस्थता वाढली आहे. कोणत्याही परिस्थितीत मतदारसंघावरील दावा सोडायचा नाही असा त्यांचा प्रयत्न आहे. परंतु, भाजपाचा दबावही वाढत चालला आहे. आता तर उमेदवारी जाहीर झालेली नसतानाही नारायण राणे यांनी चार उमेदवारी अर्ज घेतले आहेत. नारायण राणे यांचे प्रतिनिधी निवडणूक अधिकाऱ्यांकडून चार उमेदवारी अर्ज घेऊन गेल्याची माहिती मिळाली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 17 उमेदवारी अर्ज गेले आहेत. नारायण राणे यांच्यासह ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनीही चार उमेदवारी अर्ज नेले आहेत.

नारायण राणेंना तिसऱ्यांदा पराभूत करणार, अडीच लाखांच्या फरकाने आपटणार; विनायक राऊतांचं चॅलेंज

या मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 19 एप्रिलपर्यंत मुदत आहे. आता फक्त पाच दिवस शिल्लक राहिले आहेत.  या पाच दिवसांच्या आत महायुतीला येथील उमेदवारीचा तिढा सोडवावा लागणार आहे. दोन्ही पक्षांकडून माघारीचे नाव घेतले जात नाही. त्यामुळे नेत्यांचीही चांगलीच कसरत होत आहे. आता या मतदारसंघात कुणाला तिकीट मिळणार, भाजप किंवा शिंदे गट कोण दावा सोडणार याचं उत्तर लवकरच मिळणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube