शेकापचा दिवा फडफडतोय.. तरीही जयंत पाटील चौथ्यांदा आमदार होतायत!

शेकापचा दिवा फडफडतोय.. तरीही जयंत पाटील चौथ्यांदा आमदार होतायत!

साल 2004, शेतकरी कामगार पक्षाची (Peasants and Workers Party of India) अवघे दोन आमदार विधानसभेवर निवडून आले. 2009 मध्ये चार, 2014 मध्ये तीन तर 2019 मध्ये अवघा एक. म्हणजे गत चार विधानसभा निवडणुकीत शेकापचे ताकद कमी झाली हे नक्की. महाराष्ट्रात कधी काळी विरोधी पक्षाची भूमिका बजावणाऱ्या पक्षाचा दिवा आता फडफडतोय. पण या सगळ्यात टिकून आहेत ते ‘जयंत प्रभाकर पाटील’ (Jayant Patil) आणि त्यांची आमदारकी. इतर आमदार येत-जात राहिले. पण पाटील यांची आमदारकी 2002 पासून कायम आहे. 2002 ते 2014 कोकण पदवीधर आणि 2018 पासून महाविकास आघाडीच्या मदतीने ते आमदार आहेत.

आताही विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीने (Mahavikas Aaghadi) त्यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. राज्यसभा (Rajya Sabha) आणि विधान परिषदेचे (MLC) असलेले महत्व, उमेदवारांचे लॉबिंग असे सगळे असताना जयंत पाटील यांनी बाजी मारलीय. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांची मते जयंत पाटील यांना देण्याचे ठरवले आहे. एका आमदाराचे मत किती महत्वाचे असते हे राजकीय अभ्यास करणाऱ्याला वेगळे सांगण्याची गरज नाही. पण ठाकरे-पवारांनी ही रिस्क घेतलीय. त्यामुळे जयंत पाटील यांच्याकडे असे नेमके काय आहे, महाविकास आघाडीचे पाटील यांच्यावर एवढे प्रेम का ऊतु चालले आहे, हा प्रश्न पडणे सहाजिक आहे. पाहुयात याच प्रश्नाची उत्तरे… (Mahavikas Aghadi has re-nominated Jayant Patil for the Legislative Council.)

सुजय विखेंना पराभव अमान्य : ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवर शंका; लाखो रुपये भरुन करणार चौकशी

दोन ऑगस्ट 1947 साली देवाची आळंदी इथे शंकरराव मोरे आणि केशवराव जेधे यांनी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. या घटनेला आता 76 वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात पक्षाने अनेक चढ उतार पाहिले. पण कठीण परिस्थितीतीही पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले. त्यासाठी एन. डी. पाटील, दि. बा. पाटील, दत्ता पाटील, गणपतराव देशमुख, विरेंद्र बाबू देशमुख, प्रभाकर पाटील यांनी अपार मेहनत घेतली. जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी, आमदार-खासदार निवडून आणण्यासाठी या नेत्यांनी पायाला भिंगरी बांधली. अपार महेनत घेतली. आता आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल सुरू आहे. पण गेल्या दशकात या पक्षाची वाताहत झाल्याचे, ज्योत फडफडत असल्याचे चित्र आहे.

अलीकडेच पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील, अलिबागचे जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप भोईर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उरणचे माजी आमदार विवेक पाटील यांनीही राजकीय संन्यास घेतला आहे. मुरूड तालुक्याचे 21 वर्षे चिटणीस असलेले मनोज भगत यांनीही अखेरचा लाल सलाम केला आहे. आमदार जयंत पाटील यांच्याबरोबर माजी आमदार सुभाष पाटील, बाळाराम पाटील, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक अशी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी नेतेमंडळी पक्षाकडे उरली आहेत. पण इथे एक गोष्ट मान्य करायला हवी ती म्हणजे शेकापची विधिमंडळात ताकद नसली तरीही जनतेमध्ये मोठी ताकद आहे. ही ताकद एखादा आमदार, खासदार निवडून आणण्यासाठी किंवा पाडण्यासाठी पुरेशी ठरणारी आहे. त्यातही रायगड जिल्हा, नांदेड जिल्हा आणि सांगोला तालुका या पट्ट्यांमध्ये शेकाप पाच ते सहा लाखांच्या मतांचे पॉकेट बाळगून आहे.

तुम्ही कॅामेडी शोचे कलाकार, ‘सामना’चं नाव बदलून ‘टोमणा’ ठेवा…; चित्रा वाघांची राऊतांवर टीका

रायगड जिल्ह्यातील गावा-गावात शेकापच्या कार्यकर्त्यांची फळी आहे. 2014 मध्येही तीनपैकी दोन आमदार रायगडमधूनच निवडून आले होते. तर पनवेल कर्जत उरण इथले उमेदवार 50 ते 55 हजार मते घेत दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. 2017 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शेकापने 59 पैकी 23 जागांवर विजय मिळवला होता. त्याआधी 19 सदस्य होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही पनवेल, पेन आणि अलिबाग इथले आमदार दुसऱ्या क्रमांकावर होते. उरणमध्ये माजी आमदार विवेक पाटील यांच्यावर कर्नाळा बँक घोटाळ्यात कारवाई झाली. त्यानंतरही 60 हजारा पेक्षा अधिक मते मिळाली होती. या चारही मतदारसंघांमधील मिळून बेरीज केल्यास ती साडे तीन लाखांच्या घरात जाते.

मावळ लोकसभा मतदारसंघ रायगड आणि पुणे अशा दोन जिल्ह्यांमध्ये आहे. यात पुण्यातील पिंपरी, चिंचवड आणि मावळ तर उरण,पनवेल आणि कर्जत हे तीन विधानसभा मतदारसंघ रायगड जिल्ह्यातील आहेत. इथेही शेकापची महाविकास आघाडीला मोठी मदत झाली. रायगड जिल्ह्यातील या तीन मतदारसंघांमधील दोन लाखांच्या आसपासची एक गठ्ठा मते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना पडली होती. ते पिंपरी-चिंचवडचे असूनही त्यांना रायगडमधीलच मतदारसंघांमधून लीड मिळाले होते. थोडक्यात पनवेल, पेण, अलिबाग या बालेकिल्ल्यांत शेकापच किंग आहे. कर्जत, सुधागड, मुरूड, रोहा, माणगाव, पोलादपूर इथेही शेकापचे वजन आहे. एकेकाळी पनवेल नगरपालिका एकहाती शेकापच्या ताब्यात होती. आताही जिल्ह्यातील ग्रामपंचायत, कृषी उत्पन्न बाजार समित्या, मजूर सहकारी संस्था, पतसंस्थांसह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ताब्यात आहेत.

इकडे सांगोला तालुकाही शेतकरी कामगार पक्षाचा परंपरागत बालेकिल्ला. गणपतराव देशमुख यांनी हा बालेकिल्ला शाबूत ठेवला होता. 2019 मध्ये इथून शिवसेनेच्या शहाजीबापू पाटील यांनी विजय मिळवला. पण अगदी थोडक्यात होता. 600 मतांनी बापूंनी विधानसभा गाठली होती. अनिकेत देशमुख यांनी एक लाख मते घेतली होती. म्हणजे शेकापची लाखभर मते तरी इथे नक्कीच आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेलाही धैर्यशील मोहिते पाटील यांना 84 हजार मते पडली होती. यातील बऱ्यापैकी मते शेकापचीच होती. पाठोपाठ नांदेड जिल्ह्यातही शेकापचे अस्तित्व आहे. इथून श्यामसुंदर शिंदे हे पक्षाचे विधान सभेवरचे एकमेव आमदार आहेत. पण जिल्ह्याभरात शेकापचे लाखभर मतांचा गठ्ठा आहे.

म्हणजेच काय तर रायगड, मावळ, माढा, नांदेड हे चार लोकसभा मतदारसंघ आणि इथल्या डझनभर विधानसभा मतदारसंघात शेकापचा प्रभाव आहे. राज्यातील याच मतांमुळे शेकापला वगळून महाविकास आघाडीला ना लोकसभेचे राजकारण करता आले ना विधानसभेचे. आताही महाविकास आघाडीला जयंत पाटील यांची गरज भासते ती याचसाठी. त्यामुळेच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आपल्या मतांच्या जोरावर जयंत पाटील यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज