Inside Story : केजरीवाल-ठाकरेंनी फिरवली सूत्र, ममतांचा प्रस्ताव अन् PM रेसमध्ये ‘खर्गेंची एन्ट्री’
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना ‘इंडिया’ (India) आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा बनवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावाला शिवसेना (UBT), आम आदमी पक्षासह 12 पक्षांनी पाठिंबा दिला आहे. हा प्रस्ताव अद्याप मंजूर झाला नसला तरी याच नावावर एकमत होण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीची चौथी बैठक मंगळवारी (19 डिसेंबर) दिल्लीत पार पडली. यामध्ये जागावाटपासह इतर बाबींवर चर्चा करण्यात आली. याचवेळी पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याबाबतची चर्चा झाली. (Mamata Banerjee has proposed to make Congress president Mallikarjun Kharge the prime ministerial face of the ‘India’ alliance.)
ठाकरेंनी बजावली महत्वाची भूमिका :
ज्या 12 पक्षांनी खर्गे यांच्या नावाला पसंती दर्शविली त्यात शिवसेना (UBT) चाही समावेश आहे. इतकचे नाही तर या नावाची निवड करण्यामागे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जात आहे. सोमवारी दिल्लीत आलेल्या उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. त्यानंतर ममता बॅनर्जींनी केजरीवाल यांची भेट घेऊन बराच वेळ चर्चा केली. दोघांची ही भेट म्हणजे शिष्टाचाराची भेट असल्याचे सांगितले जात होते.
पण याच तीन भेटींनंतर मंगळवारी ममता बॅनर्जी यांनी बैठकीत पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून खर्गे यांचे नाव सुचविले. त्यावेळी शिवसेना (UBT), आपसहित 12 प्रमुख पक्षांनी लगेचच या प्रस्तावाला पाठिंबा दिला.
महामार्गांवरील अपघातात मोठी वाढ; अधिवेशनात सत्यजित तांबेंचे आरटीओंवर ताशेरे…
ठाकरे यांनी ममता यांच्या प्रस्वाला पाठिंबा देवून मोठी खेळी खेळल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी नितीश कुमार यांना पंतप्रधानपदाचा चेहरा करण्याबाबत चर्चा सुरु होत्या. मात्र खर्गे यांच्यारुपाने विश्वासू, अनुभवी चेहरा मिळू शकतो. शिवाय खर्गे यांना मराठी भाषा आणि महाराष्ट्राची चांगली जाण आहे. खर्गे यांना महाराष्ट्रातील प्रश्नांचीही चांगली जाण आहे. त्यामुळे मराठी आणि महाराष्ट्राच्या मुद्द्यावरुन खर्गेंच्या नावाला पाठिंबा देण्यात ठाकरेंनी उशीर केला नाही.
‘जागा वाटपासाठी खर्गे यांना निमंत्रक बनवण्याचाही प्रस्ताव आहे’
एवढेच नाही तर ममता बॅनर्जी यांनी आणखी एक प्रस्ताव ठेवल्याचे बोलले जात आहे. या प्रस्तावामुळे मल्लिकार्जुन खरगे यांचीही ताकद वाढणार आहे. खर्गे यांना जागावाटपावर देखरेख ठेवणाऱ्या समितीचे निमंत्रक बनवण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे. मात्र, या दोन्ही प्रस्तावांवर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
‘जातनिहाय जनगणना हाच आरक्षणावरचा पर्याय पण RSS च्या दबावापुढं सरकार झुकलं’
‘खर्गे म्हणाले- आधी जिंकण्याचा प्रयत्न करू’
बैठकीतून बाहेर पडलेल्या मल्लिकार्जुन खर्गे यांना विचारले असता त्यांनी अगदी स्पष्टपणे विजयावरच लक्ष केंद्रीत करणार असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, आधी निवडणुकीत विजय महत्वाचा आहे. मगच चर्चा होईल. त्यामुळे आधी आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू, मग खासदार लोकशाही पद्धतीने निर्णय घेतील. लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनाच लढावे लागेल. पुढे कसे काम करायचे हे सर्वांनी ठरवले. सर्व पक्षांनी 8-10 जाहीर सभा घेण्याचे ठरवले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.