छगन भुजबळ कशाला काडी लावतो म्हातारपणात; मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा एकदा घणाघाती वार
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण आरक्षण प्रश्नावरून उपोषण करणारे जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत.
Manoj Jarange Patil Attack Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील (Jarange) यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘छगन भुजबळ कशाला काडी लावतो म्हातारपणात…’ अशा शब्दांत जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातील आरोप-प्रत्यारोप पुन्हा एकदा तीव्र झाले आहेत. भुजबळ यांच्या भूमिकेवर निशाणा साधताना जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या मागण्यांवर ठाम असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
सोनम वांगचूक यांना जसं उचलून नेलं, तसं जरांगेंसोबत सरकारने चुकूनही करु नये; अभिजीत दिपकेंचा इशारा
अटीतटीचा सामना
दरम्यान, जरांगे पाटील म्हणाले आता सामना अटीतटीचा आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाने अंतरवालीला आलं पाहिजे. ज्यांना मुंबईला यायचं आहे, त्यांनी आम्ही ज्या मार्गाने जाऊ त्या मार्गावर सहभागी व्हावं. त्यामुळे आगामी आंदोलनात मोठ्या संख्येने लोक सहभागी होण्याचे संकेत त्यांनी दिले. मराठा समाजबांधवांना आवाहन करताना जरांगे यांनी काही काळ शेतातील कामं बाजूला ठेवून आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं. प्रत्येकाने आपल्या शेतातील काम सोडा आणि या, असं ते म्हणाले. मात्र, ज्यांना काही अडचणी आहेत किंवा ज्यांना आंदोलनात सहभागी होणं शक्य नाही, त्यांनी गावातच राहून जबाबदारी सांभाळावी, असेही जरांगेंनी स्पष्ट केलं.
गावकऱ्यांनी व्यवस्था करावी
आंदोलनासाठी बाहेर पडणाऱ्या समाजबांधवांना गावकऱ्यांनी सहकार्य करण्याचं आवाहनही जरांगे यांनी केलं. जे कोणी येणार आहेत, त्यांना गावकऱ्यांनी गाडी करून द्या. जाणाऱ्या पोरांची गावकऱ्यांनी व्यवस्था करा, असं त्यांनी म्हटलं. तसंच, आंदोलनाच्या मार्गावर जे मार्ग निश्चित केले जातील, त्या ठिकाणी समाजबांधवांनी जेवणाची सेवा आणि आवश्यक मदत उपलब्ध करून द्यावी, असंही त्यांनी सांगितलं.