भुजबळांनी आम्हाला डिवचू नये, मराठा समाज पेटला तर…; मनोज जरांगे-पाटलांचा इशारा
Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नका. त्यांना वेगळे आरक्षण द्या, अशी भूमिका भुजबळ यांनी घेतली आहे. जरांगेंनी त्यांच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला. भुजबळ साहेब आम्हाला डिवचू नका, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
जनतेच्या पैशातून परदेश दौरा, उबाठाच्या आरोपावर सामंतांनी मांडला हिशोब; म्हणाले, ‘दौऱ्यात सगळा खर्च…’
मराठा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभर मराठा आरक्षण पेटवणारे मनोज जरांगे पाटील यांनी आज सोलापूरात जंगी मेळावा घेतला. या सभेला हजारो मराठा समाजातील नागरिक जमले होते. जरांगे-पाटील शहरात दाखल होताच त्यांच्या स्वागतासाठी मराठा समाजाने मोठी गर्दी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शक्तिप्रदर्शन करत जरांगे-पाटील यांचे स्वागत केले.
यावेळी सर्व पक्षांचे मराठा नेते व कार्यकर्ते जरांगेच्या स्वागतासाठी एकटवले होते. यावेळी बोलतांना जरांगे यांनी प्रामुख्याने ओबीसी नेते आणि ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, तुम्ही मराठा समाजाची मने दुखवायला लागला आहात. मराठा समाज आजवर तुमच्याकडे कधीही जाती-पातीचा विचार न करता पाहात आला. तुमच्यासह अनेक ओबीसी नेत्यांवर आमचा मराठा समाज पिढ्यानपिढ्या गुलाल उधळत आला आहे. मराठा समाजाने कधीच तुमचा द्वेष केला नाही. पण आमची पोरं अडचणीत आहेत, तर तुम्ही म्हणता मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देऊ नका. आरक्षण खालच, वरचं द्या, असं म्हणता. यापुढं भुजबळ यांनी आम्हाला डिवचू नये, एकदा मराठा समाज पेटला की त्याचे परिणाम काय होईल, याची जाणीव ठेवा, असा इशारा जरांगेंनी दिला.
मराठा समाजाला संपूर्ण राज्यात सरसकट ओबीसी आरक्षण मिळावे, यात सरकारने पुन्हा चालढकल केल्यास त्याचे वाईट पऱिणाम होतील,असा इशारा त्यांनी दिला. मराठा आरक्षण आंदोलन निर्णायक टप्प्यावर पोहोचले असताना मराठा समाजाने एक इंचही मागे हटू नये. सरकारमध्ये बसलेल्या नेत्यांकडून मराठा समाजातील नेत्यांमध्ये फूट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीतीही जरांगेंनी व्यक्त केली.
दरम्यान, आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात मराठा, ओबीसी आणि धनगर समाज रस्त्यावर उतरला आहे. प्रत्येकजण आरक्षणाची मागणी करत असल्याने सरकारचीही कोंडी झाली आहे. मराठा समाजाला सरसकट ओबीसींमधून आरक्षण देण्याच्या मागणीला ओबीसी समाज विरोध करत आहे. त्यामुळं सरकार आता आरक्षणाचा प्रश्न कसा सोडवते हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.