सुवर्णदिन! मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, केंद्र सरकारचा मोठा निर्णय…

सुवर्णदिन! मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, केंद्र सरकारचा मोठा निर्णय…

Marathi Language : महाराष्ट्रासाठी आजचा हा सुवर्णदिन आहे. कारण केंद्र सरकारकडून मराठी भाषेला (Marathi Language) अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्राकडून ही मागणी करण्यात येत होती. अखेर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलायं. मराठी भाषेसह पाली, बंगाली, आसामी प्राकृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.

केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असल्याची अधिकृत घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असून यासंदर्भात एक्सवर फडणवीसांनी पोस्ट शेअर केलीयं. या पोस्टमध्ये फडणवीस यांनी केंद्र सरकारचे राज्यातील 12 कोटी जनतेच्यावतीने आभार मानले आहे. मराठीसारख्या लाडक्या भाषेचा केंद्र सरकारने सन्मान करीत अभिजात भाषेचा दर्जा दिल्यादबद्दल आभार, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

देवेंद्र फडणवीसांनी ट्विटमध्ये काय लिहिलं?
“आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस!

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. मी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो.

हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात सातत्याने पाठपुरावा केला. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे, हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले. मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे. अखेर आज तो सुदिन अवतरला.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मायमराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे. महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठीजनांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे”

दरम्यान, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी पाठपुरावा केला होता. अनेक वर्षांपासून ही मागणी प्रलंबित होती. राज्यातील सर्वच पक्ष या मागणीसाठी सकारात्मक होते. मात्र, मागणी पूर्ण केली जात नव्हती. मागील काही वर्षापासून सर्वच राजकीय पक्षाकडून याचा पाठपुरावा केला जात होता. २०१९ साली तत्कालीन केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल यांनी लोकसभेत सांगितलं होतं की, हा प्रस्ताव सक्रीय विचाराधीन आहे. त्याआधी २०१८ साली तत्कालीन सांस्कृतिक मंत्री डॉ. महेश शर्मा यांनी लेखी उत्तरात काय सांगितलं होतं तर हा प्रस्ताव केंद्राच्या सक्रीय विचाराधीन आहे. अखेर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube