मालेगावची घटना ताजी असतानाच बीड हादरले, शिरुर कासार तालुक्यात पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार
मुलीच्या नात्यातील व्यक्तींनी याची माहिती मिळाल्यावर त्यांनी १३ नोव्हेंबर रोजी शिरूर कासार पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.
नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या क्रूर घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला असतानाच, आता बीड (Beed) जिल्ह्यातही अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. शिरूर कासार तालुक्यातील एका गावात साडेपाच वर्षीय मुलीवर तिच्या नात्यातीलच मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीवर सध्या बीडच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
७ नोव्हेंबर रोजी ही अत्याचाराची घटना घडली. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे गावातील लोकांनी गुन्हा दाखल होऊ नये आणि कुटुंबाची बदनामी होऊ नये, म्हणून पीडित मुलीच्या आईवर दबाव आणला. वेदना असह्य होत असतानाही गावकऱ्यांनी चक्क बैठका घेऊन पीडितेला तब्बल चार दिवस उपचारासाठी जाऊ दिले नाही. गावकऱ्यांच्या धमक्यांमुळे आणि दबावामुळे कुटुंब घाबरले होते.
मुलीच्या नात्यातील व्यक्तींनी याची माहिती मिळाल्यावर त्यांनी १३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता शिरूर कासार पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. विशेष म्हणजे येथेही पीडितेसह आईला त्रास झाला. दुपारी १२ वाजता आलेल्या आईच्या हाती रात्री १० वाजता फिर्याद देण्यात आली. हे प्रकरण आतापर्यंतही दडपले होते. परंतु, मुलीला घेऊन आईने बीड गाठल्याने हा प्रकार उघडकीस आला. सध्या चिमुरडीवर जिल्हा रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
बीडमधील धक्कादायक घोटाळा! भूसंपादनात २४१ कोटींचा घोळ, दहा जणांविरोधात गुन्हा
७ नोव्हेंबर रोजी पीडितेची आई व वडील बाजार आणण्यासाठी शिरूरला गेले होते. तेव्हा, मुलगा शेतात कापूस वेचायला, तर मुलगी शाळेत गेली होती. परत आल्यावर आई-वडील दोघेही सासूला मुलीला सांभाळायला सांगून कापूस वेचणीस गेले. पीडिता शाळेतून परतल्यावर खेळण्यासाठी गेली. यावेळी नात्यातीलच मुलाने तिला कोरड्या हौदात नेऊन अत्याचार केला. मुलगी रडत घरी आली आणि आधी आजीला हा प्रकार सांगितला.
या प्रकारानंतर आई परतल्यावर तिने तिच्या कुशीत धाव घेत सर्व कुकर्म घटनेचा वृत्तांत सांगितला. परंतु, गावातील लोकांनी दबाव आणला. ‘आपण तक्रार दिली तर लोक मारतील,’ या भीतीमुळे पीडितेची आई शांत राहिली. पण, ‘असेच शांत राहिलोत तर तो पुन्हा असा गैरप्रकार करेल’ म्हणून पीडितेच्या आईने थेट पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यानंतर १३ नोव्हेंबर रोजी रात्री गुन्हा दाखल झाला.
या संपूर्ण संतापजनक घटनेबद्दल बोलताना बालकल्याण समितीचे सदस्य तत्वशील कांबळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. पोक्सो कायद्याखालील गुन्हा तत्काळ नोंदवून घेतला पाहिजे. गुन्हा नोंद करण्यात दिरंगाई करणे हा देखील गुन्हाच आहे, असे म्हणत त्यांनी शिरूर कासार पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नातेवाईक आणि गावकऱ्यांकडून प्रचंड दबाव होता, पण मुलीची आई मॅनेज झाली नाही आणि त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न केले, असेही कांबळे म्हणाले.
