बीड जिल्ह्यातील भांडणाचा अंक सुरूच; अंबाजोगाई तालुक्यात तरुणाला मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू

बीड जिल्ह्यातील भांडणाचा अंक सुरूच; अंबाजोगाई तालुक्यात तरुणाला मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू

Beed News : बीडमधील गुन्हेगारी काही थांबायचं नाव घेत नाही. (Beed) रोज हाणामारी किंवा खून अशा घटना सुरूच आहेत. अशातच किरकोळ कारणावरून तरुणाला दोन दिवस डांबून ठेवत सलग अमानुष मारहाण करण्यात आली. यात तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाई तालुक्यातील देवळा गावात उघडकीस आली आहे.

अविनाश गोरोबा सगट असं मृत तरुणाचं नाव आहे. तरुणाची आई केशरबाई सगट यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अविनाश मासे घेण्यासाठी गावातील वैभव सगट यांच्या घरी गेला होता. त्यावेळी घरात कुणी नसल्याने तो आत गेला असता विमल सगट हिने त्याच्यावर आरडाओरडा केला. त्यानंतर गावातील काही तरुणांनी मिळून त्याला रस्त्यावर पकडून जबरदस्तीने मारहाण केली. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीडमधील नारायण गडाचा वाद पेटला ! ट्रस्टी व महंत का भिडेलत ?

त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा अविनाशला जबरदस्तीने मोटारसायकलवरून उचलून नेले गेले. अंजनपूर कोपऱ्याजवळील कॅनल परिसरात त्याला बांबूच्या काठ्या, लाकडी दांडके आणि लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर मार लागल्याने आणि पोटात गंभीर दुखापत झाल्याने त्याची प्रकृती खालावली. त्याला अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी पोलिसांनी सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. गावपातळीवरील किरकोळ वाद किती गंभीर रूप घेऊ शकतो, याचे हे भीषण उदाहरण आहे. तसंच, रोज बीड जिल्ह्यात मारहाण होत असल्याने आता हा प्रश्न आणखी गंभीर होत चालला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube