“घर पेटवलं, लहान मुलींनाही मारहाण, आम्हाला न्याय द्या”, खोक्या भोसलेच्या बहिणीने काय सांगितलं?

Beed News : भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सतीश भोसलेला काल वनविभागाने चांगलाच दणका दिला. बुलडोझर लावून त्याचे घर उद्धवस्त करण्यात आले. प्रशासनाच्या या कारवाईची जोरदार चर्चा सुरू असतानाच या कारवाई विरोधात सूर ऐकू येत आहेत. कायदेशीर मार्गानेच कारवाई झाली पाहिजे घर पाडणे योग्य नाही, असे मत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्यक्त केले होते. यानंतर आता या कारवाईवर सतीश भोसलेच्या कुटुंबियांनीही नाराजी व्यक्त केली आहे. कारवाई मान्य आहे पण घर पाडणे अयोग्य आहे असे मत सतीश भोसलेच्या कुटुंबियांनी व्यक्त केले आहे.
सतीश भोसलेवर कायद्यानुसार कारवाई करा. पण आमचे घर पाडणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे. सरकारने आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी सतीश भोसलेच्या बहिणीने केली. शुक्रवारी त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. सतीश भोसले माझा भाऊ आहे. मी आतापर्यंत या प्रकरणात काहीच बोलले नव्हते. जी काही चौकशी सुरू आहे त्या बातम्या आम्ही मोबाइलवर पाहत होतो. यात खरं काय खोटं काय आम्हाला माहिती नाही.
पोलीस खात्याकडून जी काही चौकशी सुरू आहे ती आम्हाला मान्यच आहे. पण बुलडोझरने घर पाडलं. त्यानंतर दोन चार तासांनी अशी बातमी आली की घरच पेटवून दिले. त्यामुळे आम्ही तातडीने शिरुरकासार गावात आलो. घर पेटवून देताना लहान मुलींना देखील मारहाण करण्यात आली. त्यांच्यावर आता बीड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे सरकारने आता आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी खोक्या भोसलेच्या बहिणींनी केली आहे.
खोक्या असो, बोक्या असो, सगळ्यांना ठोकणार; सतीश भोसलेवरील कारवाईवरून फडणवीसांचा कडक इशारा
सतीश भोसलेला सात दिवसांची पोलीस कोठडी
सतीश भोसले याला बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 12 मार्च रोजी प्रयागराज येथून अटक केली होती. यानंतर आधी त्याला छत्रपती संभाजीनगर आणि नंतर बीड जिल्ह्यातील शिरुर येथे नेण्यात आले. वैद्यकीय तपासणी करून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सतीश भोसलेला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.