महायुतीत मिठाचा खडा! पालकमंत्रिपदासाठी शिरसाटांना तीव्र विरोध; बैठकीत काय घडलं?
Maharashtra Politics : महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि त्यानंतरचं खातेवाटप नाराजीला कारणीभूत ठरलं आहे. काही आमदारांनी दबक्या आवाजात तर काही जणांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. नव्या सरकारचं कामकाज सुरू झालं नाही तोच नाराजीचा स्पीड ब्रेकर आला आहे. महायुतीतील सर्वच पक्षांत नाराजी दिसून येत आहे. आताही शिवसेना भाजपात धुसफूस वाढल्याची बातमी मिळाली आहे. आता बस्स.. आणखी किती सहन करायचे असा सूर आळवत मंत्री संजय शिरसाट यांच्या नावाला विरोध करण्यात आला.
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं आहे. भाजपाचे आमदार अतुल सावे देखील मंत्री झाले आहेत. हे दोन्ही मंत्री छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून दोघांत रस्सीखेंच सुरू झाली आहे. यातच पालकमंत्रिपदासाठी भाजप कार्यकर्त्यांनी संजय शिरसाट यांच्या नावाला तीव्र विरोध केला आहे.
..म्हणून जयंत पाटलांना जबाबदारी दिली, संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितलं
आपली ताकद जास्त असतानाही लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाला जागा दिली. खासदार निवडूनही आणला. विधानसभेतही त्यांनाच जास्त जागा. तरी देखील त्यांचं काम केलं. आता पालकमंत्रीही त्यांचाच का? आता बस्स झालं आणखी किती सहन करायचं अशा शब्दांत भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भारतीय जनता पक्षाच्या उस्मानपुरा येथील कार्यालयात सदस्य नोंदणी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसले. पालकमंत्री पदासाठी संजय शिरसाट यांच्या नावाला विरोध करण्यात आला. मंत्री सावे हेच पालकमंत्री व्हावेत अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. इतकेच नाही तर सावे हेच पालकमंत्री व्हावेत असा ठराव एकमताने घेण्यात आला. हा ठराव घेऊन कार्यकर्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे समजते.
जिल्ह्याचा पालकमंत्री मीच होणार असा दावा मंत्री संजय शिरसाट यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर अुतल सावे यांनी देखील आम्ही पालकमंत्रिपदासाठी मागणी केली आहे, असे सांगितले. या परस्पर विरोधी भूमिकांमुळे महायुतीत कुठेतरी अंतर्गत वाद सुरू असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु, नंतर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा मुद्दा उघडपणे समोर आला.
आमचा कुणाच्याही नावाला विरोध नाही. मंत्री अतुल सावे यांना पालकमंत्रिपदाचा अनुभव आहे. शहरातील पाणीपुरवठा योजना, उद्योग, कंपन्या या सर्वात त्यांचा सहभाग होता. त्यामुळे आता हे सर्व प्रकल्प पुढे नेण्याच्या उद्देशाने सावे पालकमंत्री झाल्यास त्याचा नक्कीच फायदा होणार आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी दिली.
शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना संपण्याचा डाव, संजय शिरसाटांचे मोठे विधान