जे. पी. नड्डा फुंकणार लोकसभा निवडणुकीचे रणशिंग

जे. पी. नड्डा फुंकणार लोकसभा निवडणुकीचे रणशिंग

संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून राज्यात लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असतानाच, या निवडणुकीचे रणशिंग महाराष्ट्रातील संभाजीनगर येथून फुंकले जाणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा 2 जानेवारी रोजी संभाजीनगरमध्ये सभा घेणार आहेत.

नड्डा यांच्या या सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील भाजपचे सर्वच महत्वाचे नेते उपस्थित राहतील. विशेष म्हणजे कधीकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी याच मैदानात आपल्या सभा गाजवल्या होत्या आता तिथेच जे पी नड्डा यांची सभा होणार आहे.

दरम्यान नड्डा यांचा दौरा जाहीर झाला असून यामध्ये ते 2 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता वेरुळ घृष्णेश्वर मंदिरात दर्शनाला जातील. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता त्यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभा होईल सभेनंतर नड्डा हे वैजापूर, कन्नड, गंगापूर व शहरातील तिन्ही मतदारसंघांतील भाजप कोअर कमिटीची बैठक नड्डा घेतील. त्यानंतर शहरातील काही महत्त्वाच्या नागरिकांशी ते चर्चा करतील.

जे पी नड्डा यांचा दौरा मंगळवारी (27 नोव्हेंबर) रात्री जाहीर झाला. त्यामुळे आता स्थानिक भाजप नेत्यांकडे सभेची तयारी करण्यासाठी अवघ्या पाच दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. एवढ्या कमी वेळेत सभेची तयारी करणं भाजप नेत्यांसमोर आव्हान असणार आहे. तर सभेचे नियोजन करताना भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची धावपळ होण्याची शक्यता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube