परळीत राखेतून उडतोय दहशतीचा धुरळा… माफिया कसे होतायत गब्बर?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh ) हत्या प्रकरणानंतर परळी आणि एकूणच बीडमधील (Beed) माफियागिरी राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. पण या माफियांना मिळणारी आर्थिक रसद हाही महत्वाचा विषय आहे. परळी (Parali) थर्मल येथील राखेचा अनधिकृतरीत्या उपसा हेही माफियांचे एक आर्थिक बलस्थान असल्याचे समोर येत आहे. अगदी छोट्या माशांपासून बड्या माशांपर्यंत सर्वांनाच ही राख गब्बर करत आहेत. या राखेच्या अनधिकृत उपशामधून महिन्याकाठी कोट्यावधींची उलाढाल होत आहे. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला राख वाहतुकीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नेमका या राखेतून कसा पैसा तयार होतो?
परळी तालुक्यात गुंडाराज सुरू असून, टिकल्या वाटल्याप्रमाणे बंदुकीचे लायसन्स देण्यात आले असल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी केला आहे. तसेच त्यांनी राखेच्या आर्थिक व्यवहारावरही परखड मत व्यक्त केले. “गुंडांच्या मदतीने रात्रीच्या वेळी जवळपास 500 ते 700 टिप्पर चाललात. त्यासाठी किमान 150 गुंडांचं संरक्षण असते. परळी शहरात दिवस-रात्र हे राखेचे टिप्पर चाललेले असतात. टिप्परमधून उडणाऱ्या राखेमुळे अनेक नागरिकांना श्वसनाचे आजार जडले आहेत. पर्यावरण खाते आता बीड जिल्ह्याकडे आले आहे त्यांनीसुद्दा याकडे लक्ष द्यावे. परळीमध्ये 600 पैकी 300 वीटभट्या बोगस असून सरकारच्या जमिनीवर आहे, त्याची चौकशी करावी, अशी मागणीही आमदार धस यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
Beed Crime : ज्यांना शस्त्रांची गरज नाही, त्यांचे परवाने रद्द करणार, बीडच्या एसपींची माहिती…
आता मुद्दा असा की या राखेचे अर्थकारण नेमके कसे चालते. परळीमध्ये 1971 साली औष्णिक विद्युत केंद्राची निर्मिती झाली. सद्यस्थितीत परळीतील औष्णिक विद्युत केंद्रात 250 मेगावॉट क्षमतेचेवे एकूण तीन संच आहेत. या विद्युत निर्मितीसाठी जवळपास सात हजार टन कोळसा जळतो. हा कोळसा जाळल्यानंतर राख हाताळणी विभागात जवळपास 400 ते 600 टन राख तयार होते. त्यातील 70 टक्के फ्लाय अॅश तयार होते. तर 30 टक्के बॉटम अॅश असते. फ्लाय अॅश सिमेंट तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणून वापरली जाते. अंजली दमानिया यांच्या दाव्यानुसार, फ्लाय अॅश उचलण्यासाठी प्रिपेड पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट आहेत. यासाठी साधारण दोन वर्षांनी टेंडर काढले जाते. यात एकूण 11 सिमेंट कंपन्या असून त्यांना 80 टक्के माल दिला जातो आणि 20 टक्के माल छोट्या कंपन्यांना दिला जातो. फ्लाय अॅशच्या माध्यमातून ‘महाजेनको ला वर्षाकाठी 30 कोटी रुपयांचे उत्पन्न होते.
वाल्मिक कराड पांढऱ्या स्कॉर्पिओतून आला ती गाडी नेमकी कोणाची? वाचा A टू Z माहिती
राखेचे सगळे गौडबंगाल बॉटम अॅशमध्ये होते. याच बॉटम अॅशमधून दहशतीचा धुरळा उडवला जातो. काही जुन्या पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला ही राख कुठे टाकायची असा प्रश्न होता. त्यावेळी प्रकल्पापासून आठ किलोमीटरवर असलेल्या वडगाव दादाहरीमधील एका तळ्यात ही राख टाकायला सुरूवात झाली. हळू हळू हे तळ राखेचं तळं म्हणून ओळखलं जाऊ लागलं. सुरुवातीला फुकट राख घेऊन जा, असे म्हटले तरी ही राख कोणी घेऊन जात नव्हते. मात्र काही काळानंतर या परिसरात वीटभट्टयांनी बस्तान बसवले. त्यामुळे फुकटातही मागणी नसलेल्या राखेला सोन्याचा भाव आला. मग या राखेच्या व्यवसायात परळीतील माफियांची एन्ट्री झाली. ही राख अनधिकृतरीत्या पोकलेनच्या साहाय्याने उचलून टिप्परमध्ये टाकली जाऊ लागली आणि परिसरातील वीटभट्टयांना पुरवली जाऊ लागली. भाजक्या विटा बनवण्यासाठी या राखेची मागणी वाढू लागली. या विटा राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊ लागल्या आणि या व्यवहारातून कोट्यवधींची उलाढाल होऊ लागली. मग ही राख फक्त आपल्याच ताब्यात राहावी यासाठी मग राजकीय दादागिरी सुरू झाली.
सुरेश धस यांच्या दाव्यानुसार राखेच्या एका टिप्परसाठी 40 ते 45 हजार रुपये खर्च येतो. यातील पाच हजार रुपये टिप्पर मालकाला जातात आणि उर्वरित 35 ते 40 हजार माफियांच्या घशात जातात. धस म्हणतात त्याप्रमाणे जर दिवसाला 500 ते 700 टिप्पर चालवले जात असतील तर यातून होणारी उलाढाल ही रोजची कोटीच्या घरात जाते. तिसऱ्या बाजूला ही राख टिप्पर घेऊन जाताना काळजी घेतली जात नाही. अनेकवेळा टिप्परवर ताडपत्री न झाकता राख नेली जाते. त्यावेळी त्यातून उडणारी राख ही परळीकरांच्या नाका-तोंडात जाते. त्यातून त्यांना श्वसनाचे आजार जडले आहेत. एकूणच परळीतील माफियांसाठी जी काही आर्थिक उलाढालीची साधन आहेत त्यापैकी यातून भरभक्कम आर्थिक रसद मिळते. पण या राखेतून जन्माला आलेल्या दहशतीने परळी मात्र बेचि’राख’ झाली, हे नक्की.