मोठी बातमी! मंत्री अन् आमदारांच्या महाविद्यालयांना दणका, प्रवेश थांबवले; कारणही धक्कादायक

Maharashtra News : राज्यातील शिक्षणसम्राट मंत्री आणि आमदारांच्या (Maharashtra News) शिक्षण संस्थांना मोठा दणका बसला आहे. या महाविद्यालयांतील प्रवेश थांबवण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्या परिषदेने निर्णय घेतला आहे. यानुसा भौतिक सुविधा नसलेल्या चार जिल्ह्यांतील 113 महाविद्यालयांतील पदव्युत्तरचे प्रवेश थांबवण्यात आले आहेत. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या महाविद्यालयांचा समावेश आहे.
महाविद्यालयांत प्राध्यापकांची नियुक्ती न करणे, कागदोपत्री नियु्क्ती केल्यानंतर संबंधितांना पगार न देणे, बायोमेट्रिक हजेरीहसह भौतिक सुविधा उपलब्ध नव्हत्या. तरीदेखील ही महाविद्यालये चालवली जात होती. विद्यार्थ्यांचे प्रवेशही सुरू होते. तीन सदस्यीय समितीने महाविद्यालयांची तपासणी केली. त्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर विद्यापरिषदेने कठोर निर्णय घेतला आहे.
कर्जतच्या मेडिकल कॉलेजसाठी रोहितदादांची थेट फडणवीसांकडे फिल्डिंग; शिंदेंना भारी पडणार?
विद्यापीठाच्या विद्या परिषदेसह व्यवस्थापन परिषदेने नॅक मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश थांबवण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर राजकीय क्षेत्रातील संस्थाचालकांनी शासनाकडे मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार राज्य सरकारने नॅक नसलेल्या महाविद्यालयांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली होती. यानंतर समितीने महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या भौतिक सुविधांची पाहणी केली.
या निर्णयानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 79, जालना जिल्ह्यातील 40, बीड जिल्ह्यातील 44 आणि धाराशिव जिल्ह्यातील 24 महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश थांबवण्यात आले आहेत.
या महाविद्यालयांना बसला दणका
या निर्णयाचा फटका राजकीय नेते मंडळींना बसला आहे. कारण या नेत्यांचे कॉलेजेसचा यात समावेश आहे. फुलंब्री तालुक्यातील संत सावतामाळी महाविद्यालय राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे आहे. तसेच धाराशिवमधील आरपी महाविद्यालय (चंद्रकांत पाटील), परळीतील वैजनाथ महाविद्यालय (पंकजा मुंडे), भोकरदन येथील मोरेश्वर महाविद्यालय (रावसाहेब दानवे), मौलाना आझाद शिक्षण संस्था (सुप्रिया सुळे)
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची 5 महाविद्यालये (सतीश चव्हाण, प्रकाश साळुंके), जालन्यातील मत्स्योदरी शिक्षण संस्था (राजेश टोपे), बीडमधील आदर्श शिक्षण संस्था (जयदत्त क्षीरसागर), मुरुम येथील माधवराव पाटील महाविद्यालय (बसवराज पाटील), धाराशिवमधील तेरणा महाविद्यालय (राणा जगजितसिंह), नळदुर्ग महाविद्यालय (माजी मंत्री मधुकर चव्हाण)
विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ संपताच दानवे मवाळ?, दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबद्दल काय म्हणाले?