अशोक चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना फोन, अजितदादांनाही भेटले; उघड केलं मोठं सत्य
Ashok Chavan : अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह आणखीही काही आमदारांनी शपथ घेतली. या बंडानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. या सगळ्या घडामोडींवर ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाष्य केले आहे.
चव्हाण यांनी आज नांदेड येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी त्यांना याबाबत विचारले. चव्हाण म्हणाले, राज्यातील सरकारकडे स्पष्ट बहुमत असतानाही फोडाफोडीचे राजकारण केले जात आहे. याचा अर्थ असा की राज्यातील सरकार स्थिर नाही. त्यामुळे अन्य पक्षातील लोकांना फोडाफोडी करून आणावे लागत आहे.
आम्ही सर्व क्लिन, एकाही मंत्र्यावर केस नाही; कारवाईच्या भीतीवर भुजबळांचे स्पष्टीकरण
ते पुढे म्हणाले, माझे काही वेळआधीच उद्धव ठाकरे यांच्याबरोबर बोलणे झाले आहे. मी त्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की शिवसेना आणि काँग्रेस महाविकास आघाडीत यापुढेही एकत्र राहणार आहेत. महाविकास आघाडीत आम्ही एकत्र काम करणार आहोत. आमची महाविकास आघाडी अशीच काम करत राहिल.आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांबाबत आता अध्यक्ष शरद पवार यांनीच काय तो निर्णय घ्यावा, असे चव्हाण म्हणाले.
अजितदादांनाही भेटलो पण..
यानंतर पत्रकारांनी त्यांना दोन दिवसांपू्र्वी अजितव पवार यांना भेटल्यानंतर काय चर्चा झाली याबाबत विचारले. त्यावर चव्हाण म्हणाले, मी दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांची भेट घेतली हे खरं आहे. मात्र ही भेट आगामी निवडणुकांतील जागा वाटपाबाबत चर्चा करण्याच्या उद्देशाने होती. त्याचा आणि आताच्या राजकीय घडामोडींचा काहीच संबंध नाही.
..म्हणून आम्ही सरकारमध्ये सामील झालो – पवार
आम्ही निर्णय घेऊन या सरकारमध्ये राष्ट्रवादी आणि आमदारांनी जाण्याचा निर्णय घेतला. शपथ घेतली. अजूनही काही विस्तार केला जाईल. त्यावेळीही आणखी काही जणांना सँधी देण्याचा प्रयत्न राहिल असे स्पष्ट करत शुक्रवारीच (28 जून) विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असल्याचा गौप्यस्फोट अजित पवार (Ajit pawar) यांनी केला.
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. तसेच आपण हा निर्णय का घेतला याचीही सविस्तर माहिती दिली. पवार म्हणाले, सध्या जी काही परिस्थिती आहे याचा विचार करून विकासाला साथ देण्याचा निर्णय आम्ही घेतला. पंतप्रधान मोदी मजबुतीने देशाला पुढे नेण्याचे काम करत आहे. या पक्षाला साथ द्यायला हवी.