जाळपोळीची घटना घडली तेव्हा कुटुंब..; क्षीरसागरांनी सांगितला अंगावर काटा आणणारा ‘तो’ प्रसंग

  • Written By: Published:
जाळपोळीची घटना घडली तेव्हा कुटुंब..; क्षीरसागरांनी सांगितला अंगावर काटा आणणारा ‘तो’ प्रसंग

Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन सुरू आहे. शांततेत सुरू असलेल्या या ठा आंदोलनाला सोमवारी राज्याच्या अनेक भागात हिंसक वळण लागले. आमदार, लोकप्रतिनिधींची घरे, कार्यालये आणि वाहने जाळण्यात आली. आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर दगडफेककरून वाहने जाळण्यात आली. आमदार संदीप क्षीरसागर यांच्याही घरासह राष्ट्रवादीचे कार्यालय पेटवून देण्यात आले. दरम्यान, त्या भयावह प्रसंगाबद्दल आता संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली.

World Cup 2023: पुण्यात आज महामुकाबला; न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका आमनेसामने 

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून सोमवारी झालेल्या जाळपोळीच्या घटनेवर भाष्य केले. ते म्हणाले, बीडमध्ये सोमवारी अनेक जाळपोळीच्या घटना घडल्या. माझ्या निवासस्थानावरही हल्ला करण्यात आला. त्यावेळी माझी मुले, पत्नी आणि संपूर्ण कुटुंब घरीच होतं. मात्र मतदारसंघातील व जिल्ह्यातील नागरिकांच्या आशिर्वादे आम्ही सुखरूप असल्याची माहिती त्यांनी दिली.

क्षीरसागर म्हणाले, मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक आंदोलने केली. अतिशय शांततेत व शिस्तीत सर्व आंदोलन करणारा माझा मराठा समाज बांधव हिसक आंदोलन करू शकणार नाही. काल जो प्रकार घडला, तो मराठा समाजाने किंवा स्थानिक लोकांनी केलेला नसून काही समाजकंटकांनी केला असावा. याबाबत आताच काही बोलणार नाही. तसेच योग्यवेळी पुराव्यानिशी बोलणार असल्याचं आमदार क्षीरसागर यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं.

ते म्हणाले, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरूच आहे. त्यांच्या तब्येतीची माझ्यासह आपल्या सर्वांना काळजी आहे. शासनाने याप्रकरणी तातडीने योग्य व सकारात्मक निर्णय घ्यावा. सकल मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र आणि आरक्षण मिळावे, या मागणीला सुरुवातीपासूनच पाठिंबा आहे. तसेच शासन दरबारी पत्राद्वारेही ही मागणी करण्यात आली होती. ही मागणी होऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लावण्यासाठी मी देखील प्रयत्न करणार असल्याचा उच्चारही आमदार क्षीरसागर यांनी केला.

दरम्यान, हिंसक घटनांची गंभीर दखल राज्यसरकारने घेतली आहे. गालबोट लावणाऱ्यांविरुद्ध थेट हत्येचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल केले जाणार असल्याचं उपमुख्यमंत्री फडणीस यांनी स्पष्ट केलं. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार सकारात्मक पावले उचलत आहे. मात्र असे असतानाही जाळपोळीच्या घटना घडत आहेत, ही दुर्दैवी बाब आहे, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, ज्यांच्याकडे कुणबी वंशावळई असतील त्यांना लगोलग कुणबी दाखले देण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदेंनी दिला. तर पुरावे असलेल्यांनाच प्रमाणपत्र देण्यास आमचा नकार असल्याचं सांगत सरसकट कुणबी दाखले द्यावेत, असं जरांगे म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube