पंधरा हजार रुपयांच्या कर्जात उकळले दोन लाख; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

Chhatrapati Sambhajinagar Financial Fraud : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे घरोघरी धुणी भांडी करणाऱ्या मोलकरणीने घेतलेल्या पंधरा (Fraud) हजार रुपयांच्या कर्जापोटी महिला सावकाराने रोख दोन लाख रुपये उकळले आहेत. मात्र, अनेकदा फोन पे ॲपवर ऑनलाइन रकमाही घेतल्या असल्याचं समोर आलय.
या प्रकरणात पैसे घेत घेत साडेपाच लाख रुपयांची उसनवारी केल्याचं बाँडवर लिहून घेत ३५ हजार रुपये प्रति दिवस व्याज लावल्याचं उघड झालय. त्यानंतर संबंधित महिलेने सहकार विभाग गाठत तक्रार केली. त्यावरून सहकार विभागाच्या पथकाने छापा टाकून कारवाई करीत सावकारीची कागदपत्रे जप्त केली. नितू सुनील मेश्राम (रा. चांदमारी मशिदीजवळ, भुजबळनगर, न्यू नंदनवन कॉलनी परिसर) असे अवैध सावकार महिलेचे नाव आहे.
तालुका उपनिबंधक विलास कोळेकर यांनी याबाबत माहिती दिली. त्यानुसार, सुनीता सतीश पाडळकर (रा. भुजबळनगर, पडेगाव) या घरकाम करून उपजीविका भागवितात. त्यांनी सावकार महिला नितू मेश्राम हिच्याकडून वर्ष २०२३ मध्ये १५ हजार रुपये घेतले होते. दरम्यान, नितू हिने सुनीता यांच्याकडून दोन लाख रुपये उकळले. इतकंच नव्हे तर फोन पे ॲपवरवरही काही रक्कम ऑनलाइन घेतली.
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना काळं फासलं, वाचा काय अन् कसं घडलं?
सर्व पैसे आल्यानंतरही सावकार नितू हिच्याकडून सुनीता यांच्या घरी जाऊन धमकी देणं सुरूच होतं. काही दिवसांपूर्वी नितू हिने पाचशे रुपयांच्या बाँडपेपरवर पाच लाख ५० हजार रुपयांचा करारनामा करून घेतला तसंच, प्रति दिवस ३५ हजार रुपये व्याज द्यावे लागेल अशी धमकी दिली होती. हा प्रकार सहन न झाल्याने सुनीता यांनी १६ जून २०२५ रोजी उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे लेखी तक्रार दिली.
या तक्रारीची शहानिशा करून विभागीय सहनिबंधक शरद जरे, जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका उपनिबंधक कोळेकर यांनी सहकार अधिकारी सुभाष राठोड यांची पथक प्रमुख म्हणून नेमणूक केली. राठोड यांनी पथकातील आर. व्ही. पुंड, आर.टी. टेकाळे, प्रणाली हजारे, सूरज टाक, छावणी पोलिस ठाण्याचे ए.आर. खान, एन.ए. काळे यांच्यासह शुक्रवारी (ता. ११) सकाळी सातला सावकार नितू मेश्रामच्या घरी छापा टाकला.
दिवस उगवताच सहकारचे पथक दारात हजर झाल्याने सावकार नितू मेश्राम ही बावरली. तिने पथकाला घरात येण्यास मज्जाव केला, मात्र पोलिसांच्या मदतीने राठोड यांनी महिलेच्या घरात प्रवेश केला, तेव्हा नितूने गोंधळ घालण्यास सुरवात केली. त्यामुळे महिला पोलिसांनी तिला अक्षरशः पकडून ठेवले होते. दरम्यान, राठोड यांनी महिला सहकाऱ्यांसह घराची झाडाझडती घेतली. त्यात अवैध सावकारीचे घबाड सापडले. यावेळी घरातून शंभर आणि पाचशे रुपयांच्या बाँडवर केलेले नऊ उसनवार करारनामे, रकमांचा उल्लेख नसलेले परंतु स्वाक्षऱ्या केलेले धनादेश आढळून आलं.