17 गोण्या कांदा विकून हातात आला 1 रुपया!, ‘सरकार, सांगा आम्ही जगायचं कसं ?’

17 गोण्या कांदा विकून हातात आला 1 रुपया!, ‘सरकार, सांगा आम्ही जगायचं कसं ?’

बीड : राज्यभरात कांद्याच्या दरात घसरण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावा लागत आहे. कांद्या उत्पादनातून (Onion farming) नफा तर सोडा लावणीला आलेला खर्च सुद्धा निघत नसल्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. बीड जिल्ह्यात देखील याचा फटका शेतकऱ्यांना (Farmers) बसल्याचे पाहायला मिळत आहे. हजारो रूपये खर्च आणि प्रचंड मेहनत करूनही कांद्याने वांदा केल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. 17 गोण्या कांदा विकून केवळ एक रूपया हातात आल्याचे आष्टी तालुक्यातील बावी येथील शेतकऱ्याच्या बाबतीत घडले आहे. नामदेव पंढरीनाथ लटपटे (Namdev Pandharinath Latpate) यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेला कांद्याला 2 प्रति किलोचा भाव मिळाला असून सर्व खर्च वजा होता त्यांच्या हातात एक रुपयाचा मिळाला. यामुळं सरकार सांगा आम्ही जगायचं कसं ? असा सवाल या शेतकऱ्याच्या पत्नीने केला आहे.

आष्टी तालुक्यातील बावी येथील शेतकरी नामदेव पंढरीनाथ लटपटे यांनी आपल्या 3 एक्कर शेतात कांद्याची लागवड केली होती. यासाठी त्यांना कांद्याचे रोप, खुरपणी यासह मशागतीसाठी जवळपास 1 लाख रुपये खर्च आला होता. कांदा चांगला आल्यानं त्यांनाही वाटलं की, केलेला खर्च वगळता दोन पैसे आपल्या कुटुंबासाठी, मुलाच्या शिक्षणासाठी राहतील. त्यामुळं काढणी झाल्यानंतर लटपटे हे कांदा विक्रीसाठी अहमदनगर येथील बाजारपेठेत घेऊन गेले. 60 ते 70 किलोमीटरचा प्रवास करून अहमदनगर येथील बाजार समितीत असलेल्या, संतोष लहानु सूर्यवंशी यांच्या आडतवर नेऊन कांदा नेऊन विकला.

एकूण 17 गोण्याचे 844 किलो वजन भरले. दोन रूपये प्रतिकिलोचा भाव मिळाला. एकूण पट्टी 1688 रूपये त्यांना मिळाले. मात्र, यातुन 1461 रूपये भाडे खर्च गेला, 221 रूपये उचल गेली, इतर खर्च 5 रूपये हे सगळे वजा होता हातात केवळ एक रूपया पडला. लाखो रूपये खर्च करून कांदा लागवड केली. मात्र, एवढा खर्च करूनही हातात एक रूपया आल्यानं शेतकरी नामदेव लटपटे हवालदिल झाले आहेत.

अवघा दोन रूपये किलोचा भाव मिळाला अन् हातात एक रूपया आला. मायबाप सरकारने योग्य बाजारभाव द्यावा व होणारी थट्टा थांबवावी नाहीतर आम्हा शेतकर्‍यांपुढे टोकाचे पाऊस उचलण्या शिवाय पर्याय नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Thackeray Vs Shinde : सत्तासंघर्षाच्या सुनावणीत आणखी एक तारीख, हरीश साळवेंनी आज काय युक्तिवाद केला?

तर याविषयी त्यांच्या पत्नी म्हणाल्या, की या कांद्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतलीय. दोन पैसे मिळतील असं वाटलं होतं. त्यात कुटुंब चालेल, मुलांचे शिक्षण होईल असं वाटलं. मात्र, 17 गोणी कांद्याचा फक्त एक रुपये मिळाला. त्यामुळे या कांद्यासाठी मजुरी करणाऱ्या महिलांचे 10 हजार रुपये बाकी असलेले द्यावे कुठून ? मुलांचे शिक्षण कसं करावं ? कुटुंब कसं चालवावं ? आता मायबाप सरकार तुम्हीच सांगा जगायचं कसं ? असे एक ना अनेक प्रश्न लटपटे यांच्या पत्नीने सरकारला विचारलेत. त्यामुळे कांद्याने डोळ्यात पाणी आणलेल्या या शेतकऱ्यांना पत्नीचा टाहो सरकारला ऐकूण सरकारला आता तरी जाग येणार का? हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube