छत्रपती संभाजीनगरमध्ये उष्णतेचा कडेलोट! पारा ४३.४ अंशांवर
या हंगामात २५ एप्रिल रोजी ४१.८ अंशांची नोंद झाली होती, परंतु अवघ्या २४ तासांत हा विक्रम मोडीत निघाला.
मराठवाड्यात उष्णतेचा उचांक वाढतच चाललाय. (Marathwada) उन्हाच्या झळा छत्रपती संभाजीनगर शहरात अधिकच तीव्र झाल्या आहेत. शहराचा कमाल पारा ४३.४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला असून, मागील तीन वर्षांतील एप्रिल महिन्यातील हे सर्वाधिक तापमान ठरले आहे. चिकलठाणा वेधशाळेच्या नोंदीनुसार, या हंगामातील हा ‘हॉट संडे’ सर्वाधिक तापदायक ठरला असून सूर्याचा प्रकोप सायंकाळी उशिरापर्यंत जाणवत होता.
या हंगामात २५ एप्रिल रोजी ४१.८ अंशांची नोंद झाली होती, परंतु अवघ्या २४ तासांत हा विक्रम मोडीत निघाला. रविवारी सकाळपासूनच सूर्य आग ओकत असल्याने शहरातील मुख्य रस्ते दुपारच्या वेळी ओस पडले होते. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच या उष्णतेचा मोठा फटका बसला आहे.
तापमानाने मोडले विक्रम! अकोला सर्वाधिक गरम, विदर्भ-मराठवाड्यात उकाड्याचा तडाखा; शाळा सकाळच्या सत्रात
का वाढतेय उष्णता? ‘अँटी सायक्लोनिक सर्क्युलेशन’चे सावट
हवामान अभ्यासक श्रीनिवास औंधकर (एमजीएम वेधशाळा) यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या दरम्यान हवेच्या ३.१ ते ५.८ किमी उंचीवर ‘अँटी सायक्लोनिक सर्क्युलेशन’ तयार झाले आहे. यामुळे हवा वर जाण्याऐवजी खाली दाबली जात आहे, परिणामी ढग तयार होत नाहीत आणि तापमान वेगाने वाढत आहे. सध्या अकोला, अमरावती या शहरांप्रमाणेच संभाजीनगरमध्येही हिट वेव्हचा प्रभाव दिसून येत आहे.
पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण, पण दिलासा तात्पुरता
सोमवार आणि मंगळवारी शहरात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून कमाल तापमानात काहीशी घट अपेक्षित आहे. मात्र, हा दिलासा तात्पुरता असून बुधवारपासून पुन्हा एकदा तापमानाचा पारा चढतीकडे जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
एप्रिल महिन्यातील तापमानाची तुलना (२०२३-२०२६):
वर्ष तारीख कमाल तापमान
२०२३ १९ एप्रिल ४०.६ अंश
२०२४ १८ एप्रिल ४२.२ अंश
२०२५ २९ एप्रिल ४२.६ अंश
२०२६ २७ एप्रिल ४३.४ अंश (विक्रमी)
तज्ज्ञांचा सल्ला
सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे.
उन्हात बाहेर पडताना भरपूर पाणी प्यावे आणि सुती कपड्यांचा वापर करावा.
डोके आणि शरीर झाकूनच बाहेर पडावे.