मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरूच, पावसाने पाठ फिरलल्यानं एकाच दिवशी तिघांनी संपवली जीवनयात्रा
औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे (Farmer suicide) सत्र काही थांबतांना दिसत नाही. मराठवाड्यात यंदा पावसाने दडी मारल्यानं परिस्थिती आणखीच गंभीर बनली असून शेतकरी अडचणीत सापडला. जबाबदाऱ्यांचे ओझे, कर्जाचा डोंगर, नापिकी या कारणांमुळं आता देखील औरंगाबाद जिल्ह्यात एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघांनीही विष प्राशन करून तर एकाने गळफास घेऊन जीवन संपवले आहे. (Aurangabad news)
कर्ज काढून खरीपाची पेरणी केली, मात्र पावसाने दगा दिली. त्यामुळं नापिकी, कर्ज, रोजच्या जगण्याच कर्ज भागवायचा तरी कसा, या विंवचनेत असलेल्या कन्नड तालुक्यातील हातनूर येथील दिनकर बिसनराव बिडवे (वय ४८), फुलंबरी तालुक्यातील पीरबावडा येथील कारभारी माणिकराव पाटोळे (वय ५५) आणि वैजापूर तालुक्यातील जरुल येथील अरविंद साहेबराव मतसागर (वय ४३) या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
Ganeshotav 2023 : सोनाली पाटील अन् धनंजय पोवारला बाप्पाचे वेध; झळकले म्युझिक व्हिडिओमध्ये
हतनूर येथील शेतकरी दिनकर बिसनराव बिडवे यांनी त्यांच्या फार्म हाऊसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (10 सप्टेंबर) दुपारी 2 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. याबाबत पोलीस पाटील प्रकाश पवार यांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी दिनकर यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दिनकर यांनी नापिकी आणि कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली.
पीरबावडा येथील कारभारी माणिकराव पाटोळे या शेतकऱ्याने पावसाअभावी वाया गेलेल्या पिकाच्या चिंतेनं विषारी औषध प्राशन केले. औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी त्यांनी विषारी औषध प्राशन केले. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वडोद बाजार पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वैजापूर तालुक्यातील जरूळ येथील अरविंद मतसागर यांनी नापिकी व कर्जबाजारीपणामुळे विषारी औषध प्राशन केल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पावसाने दडी मारल्यानं खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्यानं त्याचा फटका बळीराजाला बसत आहे. मतसागर यांचेही पीक करुपन गेलं होतं. त्यामुळं डोक्यावरचा कर्जाचा डोंगर कसा फेडायचा या विवंचनेत असलेल्या अरविंद यांनी शनिवारी विषारी औषध प्राशन केले. ही बाब समजल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, काल उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.