टोकाई साखर कारखाना निवडणूक: ४० उमेदवारांची माघार, ३९ उमेदवार रिंगणात, कंगाल झालेल्या कारखान्यात सत्तेसाठी मालदार पार्ट्या झुंजणार
Tokai Cooperative Sugar Factory Election : वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखाना (Tokai Cooperative Sugar Factory) निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सोमवारी शेवटची तारीख होती. यात शेवटच्या दिवशी ४० उमेदवारांनी माघार घेतली आहे तर ३९ उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले आहेत. दोन पॅनलमध्ये झुंज लागणार असल्याचे चित्र समोर आले आहे. कंगाल अवस्थेकडे झुकलेल्या व आर्थिक दृष्ट्या डबघाईला आलेल्या या साखर कारखान्यात सत्तेसाठी मालदार पार्ट्यांनी कंबर कसली असून निवडणुकीत अटीतटीची लढाई होणार असल्याचे चित्र वसमत तालुक्यात पाहावयास मिळणार आहे. (Tokai Sugar Factory Election: 40 Candidates Withdraw, 39 Candidates in the election arena)
टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सोमवारची शेवटची तारीख होती. शेवटच्या तारखेपर्यंत एकही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नव्हता. ७९ उमेदवार पैकी शेवटच्या दिवशी ४० उमेदवारांनी अर्ज मागे घेतली आहेत यात कुरुंदा गटातील आठ, गिरगाव गटातून दोन कवठा एक, दांडेगाव पाच, सोसायटी गटातून तीन, अनुसूचित जाती जमाती एक, महिला राखीव गटातून दहा, इतर मागासवर्ग गटातून चार तर भटके विमुक्त गटातून पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. १७ जागेसाठी ३९ उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले आहेत.
सतरा संचालक निवडण्यासाठी ७२३६ मतदार २ जुलै रोजी मतदान करणार आहेत. आर्थिक संकटात सापडलेल्या टोकाई कारखान्याची निवडणूक लढवण्यासाठी कोणी समोर येणार नाही असे वाटत होते मात्र उलट चित्र समोर आले आहे. दोन तगडे पॅनल समोरासमोर उभे ठाकले आहेत.
दौंड हादरलं! आधी पत्नीचा गळा आवळला, नंतर दोन्ही मुलांना संपवलं अन् शेवटी स्वत:ही घेतला गळफास
या निवडणुकीच्या निमित्ताने वसमत तालुक्यात पुन्हा एकदा निवडणुकीची रणधुमाळी पहावयास मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या कंगाल झालेल्या कारखान्यावर सत्ता मिळवण्यासाठी तालुक्यातील गब्बरआणि मातब्बर उमेदवार आपल्या तिजोऱ्या निवडणुकीसाठी उघडणार एवढे मात्र निश्चित दिसत आहे. दोन जुलै रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. १७ संचालक निवडण्यासाठी ७२३६ मतदार मतदान करणार आहेत.
एकीकडे कारखान्याला ऊस घातलेल्या शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी कारखान्याकडे पैसे नाहीत. कारखान्यावर आरआरसी कारवाई करण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे कारखान्याची निवडणूक लढवण्यासाठी मात्र गब्बर उमेदवारांनी कंबर कसली आहे. पॅनल मध्ये जागा मिळवण्यासाठी आपण किती खर्च करू शकतो त्याच्या रकमाही उमेदवार शेवटच्या दिवशी पॅनल प्रमुखाकडे जाहीर करत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. यावरून शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी कारखान्याकडे पैसे नाहीत मात्र कंगाल झालेल्या कारखान्यात निवडणूक लढवण्यासाठी तिजोऱ्या रिकाम्या करण्यासाठी उमेदवार तयार असल्याचे विचित्र चित्र समोर आले आहे. यावरून टोकाई कारखान्यात अजून काही घबाड शिल्लक राहिले आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अॅड. शिवाजीराव जाधव विरुद्ध अंबादासराव भोसले रंगणार सामान
टोकाई सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी दोन पॅनल समोरासमोर उभे राहिले आहेत यात अॅड. शिवाजीराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील एक तर दुसरा खोबराजी नरवाडे व अंबादासराव भोसले यांच्या नेतृत्वाखालील पॅनल आहे. या दोन्ही पॅनल मध्ये दिग्गज उमेदवार रिंगणात उभे राहिले आहेत. शिवाजीराव जाधव यांनी टोकाई कारखाना नावा रूपाला आणून उभा केला. ही त्यांची जमेची बाजू आहे. मात्र त्यांच्याच कार्यकाळात कारखाना पुन्हा डबघाईला जाऊन कारखान्यावर आर आर सी ची कारवाई करण्याची वेळ आली आहे. आणि याच मुद्यावर टोकाईची निवडणूक प्रचार रंगणार आहे. पुन्हा एकदा शिवाजीराव जाधव हे मैदानात उतरले असून त्यांना त्यांच्याच संचालक मंडळात असलेल्या सहकाऱ्यांनी आव्हान दिले असल्याने आता निवडणुकीत काय निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही बाजूला तगडे व गब्बर उमेदवार असल्याने दोन्ही पॅनल मध्ये चांगली लढत होईल असे चित्र सध्या तरी दिसत आहेत.