तुळजाभवानी मंदिरात भ्रष्टाचार अन् दागिने गायबप्रकरणी विधानपरिषदेत सूचना
धाराशिव : तुळजापूर देवस्थानच्या (Tuljapur temple) लाडू घोटाळ्यातील आरोपींला निलंबित न करता त्याला पुन्हा सेवेत घेतले आणि अनधिकृतपणे महत्त्वाच्या विभागांचा कार्यभार दिला. त्यामुळेच अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे मंदिरात भ्रष्टाचार वाढला. तुळजाभवानी देवीच्या दागिन्यांच्या मोजणीत 10 मौल्यवान व शिवकालीन दागिने गायब असल्याचे आढळून आले आहे. मंदिराचा शिपाई ते विद्यमान जनसंपर्क अधिकारी असा बेकायदा प्रवास करतांना हेतुपरस्पर केलेल्या भ्रष्ट कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी सुचनेद्वारे आमदार विलास पोतनीस (Vilas Potnis) आणि आमदार सुनील शिंदे (Sunil Shinde) यांनी मांडली. (Vilas Potnis and Sunil Shinde caution Legislative Council regarding corruption and disappearance of jewels in Tuljabhavani temple)
विधान परिषदेचे सदस्य विलास पोतनीस आणि सुनील शिंदे यांनी बुधवारी लक्षवेधी सूचनेद्वारे तुळजाभवानी देवीच्या दागिने मोजणीत मौल्यवान व शिवकालीन दागिने गायब झाल्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना मांडली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवेदन देणार आहेत. नियम 93 अन्वये सार्वजनिक महत्त्वाच्या विषयावर दिलेली सूचना सभागृहात मान्य करावी, असे सांगून त्यांनी विधान परिषदेसमोर अनेक खळबळजनक मुद्दे उपस्थित केले आहेत.
Manipur Violence: महिलांवरील अत्याचाराच्या व्हायरल व्हिडिओची आता सीबीआय चौकशी
शिपाई असलेल्या नागेश शितोळे यांची हवालदाराची तुळजाभवानी मंदिर समितीने बेकायदेशीरपणे जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. शितोळे यांच्या हुकूमशाही कारभारामुळे शासनाचे व महसुलाचे मोठे नुकसान झाले आहे. संबंधित व्यक्तीला बेकायदेशीरपणे कॉन्स्टेबल, संगणक सहाय्यक, आस्थापना लिपिक ते तुळजाभवानी देवी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकारी या पदावर अर्हता डावलून बढती देण्यात आली. राज्यभर गाजलेल्या तुळजा भवानी देवस्थान लाडू घोटाळ्यात संबंधित व्यक्तीवर सात आरोप सिद्ध होऊनही त्यांना पुन्हा एकदा अनधिकृतपणे सेवेत रुजू करून महत्त्वाच्या विभागांचा कार्यभार देण्यात आल्याचेही पोतनीस व शिंदे यांनी विधान परिषदेच्या निदर्शनास आणून दिले.
19 जुलै रोजी तुळजाभवानी मातेच्या तिजोरीतून 10 मौल्यवान व शिवकालीन दागिने गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. देवीच्या दुसऱ्या दागिन्यांच्या बॉक्समधील दागिने गायब झाले आहेत. हे दागिने नेमके कधी गायब झाले हे कळू शकलेले नाही, असे पंच समितीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांनी पंच समितीचा अहवाल न स्वीकारता फेरपडताळणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्याचेही पोतनीस व शिंदे यांनी सभागृहात सांगितले.