खासदार बंडु जाधव कोड्यात बोलले… राजकारण बदलतय… वेळ पाहून वागाव लागत
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे जाधव आता शिंदे गटाची वेगळी वाट धरणार का? अशा चर्चांनी जोर धरला आहे.
राज्याच्या राजकारणात अलीकडं (Sanjay Jadhav) नव्याने अनेक भूकंप रोज होताना दिसत आहेत.अशातच, परभणीतील एका खाजगी रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी केलेल्या एका विधानाने राजकीय वर्तुळात पुन्हा मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे जाधव आता शिंदे गटाची वेगळी वाट धरणार का? अशा चर्चांनी जोर धरला आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘मी ज्यांच्यामुळे मोठा झालो त्यांचा कधीही विश्वासघात करणार नाही, पण सध्याची परिस्थिती बदललेली आहे. निवडणुकीत आर्थिक गणित महत्त्वाची असतात, त्यामुळं पुढे काय होईल सांगता येत नाही. जाधव यांच्या या विधानातील ‘आर्थिक गणित’ आणि ‘बदलेली परिस्थिती’ या दोन शब्दांनी सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, त्यांनी थेट पक्षांतराचं नाव घेतलं नसलं तरी, भविष्यात ते ‘परिस्थितीनुसार’ मोठा निर्णय घेऊ शकतात, असे संकेत त्यांनी त्यांच्या बोलण्यातून दिले आहेत. त्याचबरोब मागील काही दिवसांपासून संजय जाधव हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठत आहेत, अशातच त्यांनी वरील विधान केलं आहे.
विशेष म्हणजे, पत्रकारांनी यावर त्यांची भूमिका विचारली असता त्यांनी कॅमेरासमोर अधिक भाष्य करणं टाळलं, ज्यामुळे संभ्रम अधिक वाढला आहे.
संजय जाधव यांनी अद्याप पक्ष सोडण्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, परभणीत ठाकरे गटाची मोठी ताकद असलेल्या जाधवांनी जर टोकाचा निर्णय घेतला, तर तो ‘उबाठा’ गटासाठी मोठा धक्का मानला जाईल. जिल्ह्याच्या राजकारणात सध्या जाधव ठाकरेंच्या शिवसेनेतच राहणार की शिंदे गट किंवा भाजपकडे वळणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.