प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही वारकऱ्यांनी ‘लालपरी’ श्रीमंत केली; उत्पन्न मांडत मंत्री सरनाईकांनी व्यक्त केलं समाधान

भाविक-प्रवाशांना विविध सवलतींचा लाभ देत प्रचंड गर्दी, वाहतुकीचा ताण आणि हजारो फेऱ्यांचं नियोजन केलं.

News Photo   2026 08 02T172237.265

विठुरायाच्या दर्शनासाठी गेलेल्या वारकऱ्यांनी (Bus) यंदाही महाराष्ट्राची ‘लालपरी’ श्रीमंत करून सोडली. आषाढी यात्रेनिमित्त एसटी महामंडळाने सुमारे 5,500 बसच्या माध्यमातून 9 लाखांहून अधिक भाविक-प्रवाशांना सुखरूप आणि सुरक्षित प्रवास घडवला. लाखो वारकऱ्यांची सेवा करण्याचं भाग्य एसटी परिवाराला लाभलं, ही आमच्यासाठी विठुरायाची कृपा असल्याची भावना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.

आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळाने राज्याच्या विविध भागांतून पंढरपूरसाठी विशेष वाहतुकीचं नियोजन केलं होतं. यात्रेच्या कालावधीत एसटीने 21 हजार 527 फेऱ्यांद्वारे 9 लाख 24 हजार 738 भाविक-प्रवाशांनी प्रवास केला. विशेष म्हणजे, यात्रेच्या वाहतुकीतून एसटी महामंडळाला 41 कोटी 18 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्नात सुमारे 5 कोटी 30 लाख रुपयांची वाढ झाली आहे.

एसटी महामंडळाची 13.50 टक्के भाडेवाढीची तयारी, डिझेल, टायर आणि कर्मचाऱ्यांच्या वाढीव खर्चाचा परिणाम

वारकऱ्यांच्या भक्तिमय प्रवासाचा एक छोटासा भाग होण्याचे भाग्य आपल्या लालपरीला दरवर्षी लाभते. एखाद्या भाविकाला विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला सुखरूप पोहोचवणे आणि दर्शनानंतर त्याला सुरक्षितपणे आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचवणे, ही केवळ प्रवासी वाहतूक नाही, ती एसटीच्या माध्यमातून घडणारी विठ्ठलसेवाच आहे असंही ते म्हणाले.

भाविक-प्रवाशांना विविध सवलतींचा लाभ देत प्रचंड गर्दी, वाहतुकीचा ताण आणि हजारो फेऱ्यांचं नियोजन केलं. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीतही भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी पार पाडली. अशाच प्रकारे संपूर्ण राज्यातील प्रवासी हा आपला ‘विठुराया’ आहे, असं मानून प्रवासी देवो भव: या भावनेतून एसटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सातत्याने आपली सेवा बजावावी असं आवाहन या निमित्ताने मंत्री सरनाईक यांनी केलं आहे.

follow us