शिंदेंचा शिलेदार गोत्यात; आमदार शिरसाटांना आयकर विभागाची नोटीस, स्वतः दिली माहिती

Sanjay Shirsat : एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यावर अनेक गंभीर आरोप केल्यानंतर आता मंत्री शिरसाट यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाने (Income Tax Department) नोटीस बजावली आहे. गेल्या काही वर्षात शिरसाट यांच्या उत्पन्नात मोठी वाढ झाल्याने आयकर विभागाने त्यांना नोटीस पाठवली आहे. याबाबत शिरसाट यांनी स्वत: माहिती दिली आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री शिरसाट म्हणाले की, आयकर विभाग त्यांचा काम करत आहे. त्यांना जी माहिती हवी आहे आम्ही त्यांना देऊ. त्यांना पूर्ण सहर्काय करु.आयकर विभागात काही लोकांनी तक्रार केली तर त्याबाबत चौकशी करणे आयकर विभागाचा काम आहे. उत्पन्नात कशी वाढ झाली याबाबत 2024 च्या निवडणुकीमध्ये मी संपूर्ण माहिती दिली आहे. आयकर विभागाने उत्तर देण्यासाठी वेळ दिला आहे. त्या कालावधीमध्ये आम्ही आयकर विभागाला उत्तर देणार असल्याची प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना मंत्री शिरसाट यांनी दिली.
तसेच माझ्यावर कोणताही राजकीय दबाव नाही. विरोधक काहींना काही आरोप करत असतात त्यांना उत्तर देणे आमचे काम आहे. असेही यावेळी मंत्री शिरसाट म्हणाले. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर छत्रपती संभाजी नगर येथील व्हिट्स हॉटेल प्रकरणी विरोधकांनी अनेक गंभीर आरोप केले आहे. या प्रकरणात मंत्री शिरसाट यांचा मुलगा हॉटेल खरेदी करत होता मात्र या प्रकरणात विरोधकांकडून आरोप करण्यात आल्यानंतर शिरसाट यांच्या मुलाने टेंडर प्रक्रियेतून माघार घेतली होती.
भाजपाचं ठरलं! पुण्यात अजितदादांना शह? शिलेदारांना खास मिशन अन् इनकमिंगही…
तर दुसरीकडे याच प्रकरणात संजय शिरसाट यांच्याविरोधात आयकर विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत आयकर विभागाने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना नोटीस पाठवली असल्याची देखील माहिती समोर आली आहे. याचबरोबर शिवसेना शिंदे गटाचे खासदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना देखील आयकर विभागाने नोटीस पाठवली असल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.