MPSC : एमपीएससीच्या गट ‘क’ अन ‘ड’ परीक्षेबाबत संभ्रम ?
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने इतिहासातील सर्वात मोठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मात्र, यामध्ये सर्वात जास्त पदांची प्रसिद्ध केली असली तरी, विद्यार्थ्यांमध्ये गट ‘ब’ व गट ‘क’ या संयुक्त परीक्षेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये अनेक संभ्रम आहेत. ‘क’ गटची तयारी करणाऱ्यांना, ब गटासोबतीच्यांशी स्पर्धा करावी लागणार आहे. ग्रामीण भागातला तयारी करणारा विद्यार्थी या परीक्षा पद्धतीमुळे बाहेर फेकला जाणे साहजिक आहे. ही संयुक्त पूर्व परीक्षा गट ‘क’ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकणार नाही. तर या प्रकारामुळे खासगी क्लासेसच्या दुकानांना फायदा होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने बदल करताना सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा विचार करून करावा, अशी मागणी युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी केली.
तर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे कार्याध्यक्ष महेश घरबुडे यांनी सांगितले की, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या आणि सर्व विद्यार्थ्यांच्या प्रयत्नाने लिपिक पदे जी आजपर्यंत फक्त वशिल्याने भरली जायची ती आता आयोगामार्फत भरली जाणार आहे. आयोगाच्या इतिहासात आजपर्यंतची सर्वात मोठी जाहिरात आहे. परंतु, यातील लिपिक-टंकलेखक पदांच्या प्राधिकरण निवडीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा यामध्ये विचार केलेला दिसत नाही. त्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विचार करून बदल करावा, अशी आम्ही आयोगाकडे मागणी करणार आहे.